सोलापूर : माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांच्या मुलाच्या विवाहकार्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अचानक हजेरी लावली. पवारांचा हा खासगी दौरा असला तरी विवाह कार्यानंतर अर्धा तास पवारांनी सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वऱ्हाडी मंडळींशी बंद खोलीत चर्चा केलीय. कारण पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्यानंतरचा हा पहिलाच दौरा होता.
उत्तम जानकर यांचे चिरंजीव जीवन यांचा विवाह जत जि.सांगली येथील सुभाष माने पाटील यांची कन्या स्नेहल हिच्याशी वेळापूर येथे जानकर निवासात पार पडला. या कार्यासाठी शरद पवार हे हेलिकॉप्टरने वेळापुरात दाखल झाले.
जिल्ह्यातील मोजक्याचं निमंत्रित राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. कोरोनाच्या नियमांचे पालन करत पवार यांच्या उपस्थितीत फक्त पन्नास लोकांत हे विवाह कार्य पार पडले. त्यानंतर पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या समवेत अर्धा तास चर्चा केली. यावेळी पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीतील पक्षाचा पराभव, कोरोनाची जिल्ह्यातली स्थिती, उपाययोजना, साखर कारखान्यांची स्थिती अन शेतकऱ्यांची देणी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आ. बबनराव शिंदे, आ. संजय शिंदे, आ. यशवंत माने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, कार्याध्यक्ष उमेश पाटील, माजी आ.दीपक साळुंखे, विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, संतशिरोमणी साखर करखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे आणि जिल्हा परिषद सदस्य विक्रांत पाटील आदी उपस्थित होते.