अमरावती : शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यातील आरोग्य विभागाच्या परीक्षेवरून राज्य सरकारला टोला लगावला आहे.’आरोग्य विभागाच्या परीक्षेत दोन वेळा घोळ होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. राज्य सरकारनं किमान एक तरी पारदर्शक काम करावे,’ असे कडू यांनी म्हंटले आहे.
बच्चू कडू यांनी अमरावती येथे आज माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, आरोग्य विभागाच्या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्याची मागणी केली आहे.
मागील वेळी परीक्षा रद्द करून परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. तर आता 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षेतही गोंधळ उडाला आहे.
आरोग्य विभागाच्या परीक्षेत दोन वेळा घोळामुळे विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावे लागलेले आहे.एकाच दिवशी होणाऱ्या दोन पेपरसाठी सकाळी एका वेगळ्या जिल्ह्यात आणि दुपारी आणखी वेगळ्या जिल्ह्यात केंद्र दिल्याचं समोर येतंय. हे अत्यंत दुर्दैवी आहे. तरीही न्यासा कंपनीला पुन्हा परीक्षेचं काम दिल्याची खंत आहे. ज्या कंपनीने घोळ केला तरी त्यांना काम द्यायचं कारण काय? त्याबाबत सरकारने उत्तर द्यावे, असेही बच्चू कडू यांनी यावेळी म्हंटले आहे.