नागपूर : करोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात धुमाकूळ घातल्यानंतर तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. त्यामुळे दोन आठवड्यांपूर्वी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचे लहान मुलांवर ह्यूमन ट्रायल (Corona Vaccination Human Trials) सुरू झाले. पहिल्या टप्प्यात १२ ते १८ वयोगटातील ४१ मुलांना या लसीच्या पहिल्या डोसची मात्रा दिली गेली. या ट्रायलमधून दिलासादायक माहिती समोर आली आहे.
लस दिलेल्या कोणालाही रिअॅक्शन न आल्यानं त्याचे सकारात्मक परिणाम मंगळवारी समोर आले. त्यामुळे आता बुधवारी दुसऱ्या टप्प्यातील ६ ते ११ वयोगटातील मुलांवर लसीचे ह्युमन ट्रायल घेतले जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात मुलांना लसीची मात्रा दिल्यानंतर त्यांच्या रक्ताचे नमुने नवी दिल्लीतील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल मंगळवारी सकारात्मक आल्यानं बुधवारपासून दुसऱ्या टप्प्यातील ६ ते १२ वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिनच्या लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. लहान मुलांवरील ह्यूमन ट्रायलसाठी देशातील पाच केंद्रांमध्ये नागपूरचाही समावेश आहे. त्यामुळे करोनाच्या लढ्यात रामबाण औषध ठरलेल्या या लसीला उपराजधानीच्या सहभागाचा बुस्टर डोस कामी येणार आहे.
तीन टप्प्यांत होत आहे ट्रायल
लहान मुलांवरील कोव्हॅक्सिन लसीचं मेडिट्रेना रुग्णालयात तीन टप्प्यांमध्ये ट्रायल घेतलं जात आहे. पहिल्या टप्प्यात ४१ मुलांना लसीचा पहिला डोस दिला गेला. दुसऱ्या टप्प्यात ६ ते ११ आणि तिसऱ्या टप्प्यात २ ते ६ वयोगटातील मुलांवर ही ह्यूमन ट्रायल होईल.
दरम्यान, अन्य दोन टप्प्यांतील ह्युमन ट्रायलदेखील यशस्वी झाल्यास मुलांबाबत चिंतेत असणाऱ्या पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
[ad_2]