Home महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात वाळू उपसा थांबेना, निसर्गप्रेमींनी उपसले ‘हे’ शस्त्र

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात वाळू उपसा थांबेना, निसर्गप्रेमींनी उपसले ‘हे’ शस्त्र

0
महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात वाळू उपसा थांबेना, निसर्गप्रेमींनी उपसले ‘हे’ शस्त्र

अहमदनगर: अवैध वाळू उपशावर नियंत्रण आणि कारवाई करणाऱ्या महसूल खात्याची जबाबदारी असलेल्या मंत्र्यांच्या संगमनेर तालुक्यातच वाळू उपशाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अनेकदा तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ निसर्गप्रेमी आणि ग्रामस्थांनी प्रवरा नदीपात्रात झोपून आंदोलन केले. (Villagers and Nature Lovers Protest against illegal Sand Extraction)

संगमनेर जवळच्या खांडगाव येथेही मंगळवारी या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तेथेही अवैध वाळू उपसा सुरू आहे. रात्रंदिवस वाळू उपसा आणि वाहतूक होत असल्याने ग्रामस्थांना रात्रीची झोपही अशक्य झाली आहे. त्यामुळे रास्तारोको करण्यात आला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर बुधवारी संगमनेरजवळ प्रवरा नदीपात्रातील गंगाईमाई घाट परिसरात नागरिकांनी नदीपात्रात झोपून आंदोलन केले. वाळू उपशामुळे नदीपात्रातील पुरातन घाट, मंदिरे यांनाही धोका निर्माण झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ वाळू उपसा बंद करण्याची मागणी करीत आहेत. मात्र, प्रशासन लक्ष देत नसल्याने हे आंदोलन केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा हा तालुका असल्याने तेथे अशा प्रकारांची लगेच चर्चा होते. प्रशासन आणि पोलिस कारवाई करीत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. अनेकदा पोलिसांनी पकडलेली वाहने कारवाईविना सोडून दिल्याचा अनुभवही ग्रामस्थांनी घेतला आहे. तर काही वाळू चोर बनावट पावत्या, बनावट कागदपत्रे दाखवून सुटका करून घेतात. वाळू उपशासाठी अनेक मध्यस्थ, दलाल तयार झाले असून त्यांचे प्रशासनाशी कसे लागेबांधे आहेत, यासंबंधीच्या ऑडिओ क्लीपही व्हायरल झालेल्या आहेत. एका बाजूला तालुक्यात करोनाने उच्छाद मांडलेला असतानाही दुसरीकडे वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. आता करोना नियंत्रणात आल्यानंतर वाळू उपसा पुन्हा वेगाने सुरू झाला आहे. पावसाळ्यात नदीला पाणी आल्यावर वाळू उपसा करता येत नाही. त्यामुळे पाणी येण्यापूर्वीच नदी पात्रातील वाळू बाहेर काढून ती साठवून ठेवण्यासाठी संबंधितांची धावपळ सुरू असेत. अनेक ठिकाणी लिलाव झालेले नाहीत, तर कोठे लिलावात ठरल्यापेक्षा जास्त प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. करोनाच्या उपाययोजनांत प्रशासन अकडल्याचाही वाळू चोरांनी गैरफायदा घेतल्याचे दिसून येते. कडक कारवाई होत नाही, चोरांना पाठिशी घालण्याचे प्रकार होतात, त्यामुळे त्यांचे धाडस वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आमच्या गावातील वाळू उपसा थांबवा अशी हात जोडून विनंती खांडगाव येथील ग्रामस्थ करीत होते. तर संगमनेरमधील घाटावर निसर्गप्रेमींनी नदीपात्रात ठिय्या दिला आणि नंतर तेथेच झोपून आपल्या आंदोलनाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. अवैध वाळू उपशाविरूदध वेळोवेळी कारवाई सुरूच असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येतो.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here