मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात तीव्र मतभेद झाल्याची चर्चा सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यूपीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या चर्चेला प्रसारमाध्यमांमध्ये देखील प्रसिद्धी मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं या संदर्भात भाष्य केलं आहे. (NCP on Modi Vs Yogi Trend)
‘काही दिवसांपासून मोदी आणि योगी यांच्यामध्ये मतभेदाचे वातावरण असल्याच्या बातम्या देशात आणि उत्तर प्रदेशमध्ये येत आहेत, परंतु करोना काळातील अपयश झाकण्यासाठी भाजपची ही ठरवून केलेली रणनीती आहे,’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. ‘करोना काळात उत्तर प्रदेशमधील गंगा नदीत करोनाबाधित लोकांचे मृतदेह फेकण्यात आल्याचं भयावह चित्र अख्ख्या देशानं आणि जगानं पाहिलं. यामुळं योगींच्या कारभाराचे देशात आणि जगातही वाभाडे निघाले. हे अपयश झाकण्यासाठी मोदी विरुद्ध योगी असं चित्र उभे करण्याचा भाजपचा प्लान आहे,’ असं मलिक म्हणाले.
‘चार वर्षांच्या आपल्या कार्यकाळात योगींनी उत्तर प्रदेशात केवळ द्वेषभावना वाढीस लावण्याचं काम केलं आहे. सर्वसामान्य जनतेला फायदा होईल अशी एकही योजना राबवण्यात आली नाही. करोनाच्या काळात फक्त सरकारच्या तिजोरीतील निधी मोठमोठ्या जाहिरातींवर खर्च करण्यात आला. उत्तर प्रदेशात आपला पराभव होणार हे भाजपला आता कळून चुकलं आहे. त्यामुळंच भाजप चिंताग्रस्त झाली आहे,’ अशी टीकाही मलिक यांनी केली आहे.
अशी झाली चर्चेला सुरुवात
नुकताच योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवस झाला. पक्षाच्या एखाद्या महत्त्वाच्या नेत्याचा वाढदिवस असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते भाजपमधील बहुतेक नेते सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव करतात. मात्र, योगी आदित्यनाथ यांच्या वाढदिवशी मोदींबरोबर अन्य महत्त्वाच्या नेत्यांनीही शुभेच्छांचं ट्वीट केलं नाही. तेव्हापासून मोदी व योगी यांच्यात आलबेल नसल्याच्या चर्चेला तोंड फुटलं आहे. सोशल मीडियावर याबाबतचा हॅशटॅगही ट्रेंड होत आहे.