मुंबई: विधानसभेत गदारोळ व तालिका अध्यक्षांशी गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आला आहे. सत्ताधारी पक्षानं आवाजी मतदानानं हा ठराव मंजूर केला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईचा निषेध केला आहे. ‘भाजपचं संख्याबळ जाणीवपूर्वक कमी करण्याचा हा डाव आहे,’ असा आरोप त्यांनी केला आहे. (Devendra Fadnavis Attacks Maha Vikas Aghadi Government over BJP MLA Suspension)
आमदारांच्या निलंबनानंतर फडणवीस यांनी विधानभवनाच्या आवारात पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सरकारवर मोठा आरोप केला. ‘आम्हाला जी शंका होती, ती खरी ठरली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही सरकारला उघडं पाडलं. त्यामुळंच खोटे कहाण्या रचून ही कारवाई करण्यात आली आहे. ही मॅन्युफॅक्चर्ड कारवाई आहे. पण आम्ही मागे हटणार नाही. आमच्या सर्व आमदारांचं निलंबन केलं तरी आम्ही ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आवाज उठवत राहू,’ असा निर्धार फडणवीसांनी बोलून दाखवला.
‘भाजपच्या सदस्यांच्या निलंबनाचा ठराव म्हणजे विरोधकांचं संख्याबळ जाणीवपूर्वक कमी करण्याचा डाव आहे. विरोधकांची संख्या कमी झाली तर सरकारला अधिवेशन सोप्पं जाईल. विरोधक वेगवेगळी प्रकरणं काढतील ही भीती सरकारला आहे. त्यामुळंच भाजपच्या आमदारावर ही कारवाई झाली आहे. हा लोकशाहीचा खून आहे,’ अशी टीका त्यांनी केली. ‘भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) स्वत: काय बोलले हे मी सांगणार नाही. ते मला शोभतही नाही,’ असं फडणवीस म्हणाले. ‘अध्यक्षांच्या चेंबरमध्ये बाचाबाची होणं ही काही पहिली वेळ नाही. काही सदस्यांनी गैरवर्तन केलं असेल तर अध्यक्षांनी त्यांच्याशी चर्चा करायला हवी. पण थेट निलंबन करणं योग्य नाही,’ असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ‘आशिष शेलार यांनी अध्यक्षांचीही माफीही मागितली होती. तरीही त्यांच्यावर कारवाई केली गेली,’ असं फडणवीस म्हणाले.