परभणी : जिल्ह्यातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलसचिव रणजित पाटील यांनी शासनाच्या परवानगीविनाच परस्पर वेतन वाढवून व अडीच वर्षांपासून ते वाढीव वेतन उचलून शासनाची थेट फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कृषी विद्यापीठाच्या नियंत्रकांनी यासंदर्भात कुलसचिव पाटील यांना ११ जून रोजी एक नोटीसीद्वारे तात्काळ २१ लाख ४ हजार २५५ रुपये एक रकमी जमा करावेत, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात कुलसचिव म्हणून रणजीत पाटील हे कार्यरत आहेत. तेव्हापासून ते ३७४००- ६७००० ग्रेड वेतन व ८७०० ही वेतनश्रेणी या प्रमाणे वेतन उचलत होते. मुळात ऑक्टोबर २०१८ मध्ये कार्यालयीन आदेशामध्ये पाटील यांना मूळ सेवेत लागू असणारे वेतन,भत्ते, रजा, प्रवास वैद्यकीय सवलत,गट विमा योजना याबाबत नियम लागू असतील असे नमूद केले होते. असं असलं तरी देखील कुलसचिव पाटील यांनी या विद्यापीठात कुलसचिव या पदावर रुजू झाल्यापासून ते आजपर्यंत वरिष्ठ वेतन श्रेणी म्हणजे ३७४००- ६७००० ग्रेड वेतन,८७०० वेतनश्रेणीनुसार वेतन उचलले आहे.
यासंदर्भात कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य लिंबाजीराव भोसले यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अशोक धवण व राज्य सरकारचे लक्ष वेधले होते.
कृषी विद्यापीठाच्या नियंत्रकांनी या अनुषंगाने कुलसचिव पाटील यांना एका नोटीसीद्वारे आपणास देय असणाऱ्या वेतनश्रेणीनुसार आपले वेतन व व आतापर्यंत विद्यापीठ स्तरावरून प्रदान करण्यात आलेले वेतन याच्या फरकाची रक्कम २१ लाख ४ हजार २५५ रुपये एवढी होत असून ही अतिप्रदान झालेली रक्कम तात्काळ शासनखाती चलनाद्वारे एक रकमी भरणा करून समायोजित करावी असे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, कृषी विद्यापीठाच्या कुलसचिव रणजित पाटील यांनीच विद्यापीठाद्वारे परस्पर जादा वेतन उचलून शासनाची फसवणूक केल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात व प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पाटील यांच्याविरुद्ध प्रशासकीय स्तरावरून शासनाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हे दाखल करावेत आणि त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणीही केली जात आहे.