मुंबई – मुंबईतील क्रुझ ड्रग्ज प्रकरणात शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी तिवारी यांनी एक पत्र लिहून एनसीबीच्या विरोधात तक्रार करत मानवाधिकार जपण्यासाठी आणि सत्तेचा गैरवापर थांबावावा यासाठी सुओ मोटू याचिका दाखल करून घ्यावी, अशी मागणी केली आहे.
किशोर तिवारी यांनी लिहिलेल्या पत्रात ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खानच्या जामीन याचिकावर होत असलेल्या दिरंगाईबाबतही आक्षेप घेण्यात आला आहे. गेल्या काही काळापासून एनसीबी ही फिल्म इंडस्ट्री व मॉडेल्सला हेतूपुरस्सर टार्गेट करत असल्याचेही त्यात म्हटले आहे. तसेच या प्रकरणी किशोर तिवारी यांनी न्यायालयाकडून उच्च स्तरीय चौकशीची मागणी केली.
दरम्यान, आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी गोव्याला जाणाऱ्या क्रुझवर छापेमारीदरम्यान अटक केली होती, तर उर्वरित पाच इतर आरोपींना दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती.