पुणे, 11 जून: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor)राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात तब्बल तीन तास चर्चा झाली आहे. प्रशांत यांनी शरद पवार यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली आहे. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. याभेटीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात (Pune) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदे दरम्यान त्यांना शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवरुन प्रश्न विचारण्यात आला. यावर अजित पवार म्हणाले की, प्रशांत किशोर यांनी स्वतः सांगितलं मी यापुढं रणनीतीकार म्हणून काम करणार नाही आहे. तसंच शरद पवार वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना भेटत असतात.
पुढे अजित पवार म्हणाले की, आता प्रशांत किशोर यांचे मागील काही अनुभव असतील, वेगळी काही कामं असतील. पण त्यांनी राजकारणाचं क्षेत्र आता सोडलं आहे. त्यामुळे त्या क्षेत्राची चर्चा होण्याचं कारण नाही. केंद्रात किंवा राज्यात प्रशांत किशोर यांची मदत घेणार असं नसल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.