मुंबई: विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केलेल्या एका वक्तव्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राजकारण हे चंचल असल्याने २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीचे आखाडे तुम्ही आताच बांधू शकत नाही असे वक्तव्य खासदार राऊत यांनी नाशिकमध्ये केले आहे. त्याला दरेकरांनी प्रत्युत्तर दिले आहे. राजकारण हे कधीच चंचल नसते. राजकीय नेते चंचल असतात. शिवसेनेची विचारधारा आता चंचल झाली आहे, अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. (opposition leader pravin darekar criticizes shiv sena)
प्रवीण दरेकर हे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. संजय राऊत हे जसे बोलतात तसे राजकारणात घडत नाही. राजकारण हे कधीही चंचल नसते, तर राजकीय नेते चंचल असतात. मात्र असे असले तरी आपली वैचारिक भूमिका आणि आपली विचारधारा कधीही चंचल नसावी. शिवसेनेकडून हीच गोष्ट घडत आहे. संजय राऊत यांनी याचा विचार केला पाहिजे, असे दरेकर यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही शिवसेनेला घेरले
या वेळी प्रवीण दरेकर यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला घेरले. मराठा आरक्षणाचा मुद्दा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यावर दरेकर यांनी भाष्य केले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेना आता नुसती टोलवाटोलवी करत असल्याचे दरेकर म्हणाले.
शिवसेनेला ५ वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा
राज्यात शिवसेनेकडे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद राहील असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. शिवसेनेचाच मुख्यमंत्री ५ वर्षे राहील. त्यात ना कोणता वाटा किंवा घाटा नसेल. तसा शब्दच देण्यात आलेला आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यावर दरेकर यांनी भाष्य केले आहे. शिवसेनेला ५ वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा आहेत, असा टोला दरेकर यांनी शिवसेनेला लगावला आहे.