सांगली : तासगाव तालुक्यातील आरवडे येथे घराच्या मागे असलेल्या शेततळ्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू झाला आहे. शौर्य संजय मस्के (वय-६, रा. आरवडे, ता. तासगाव) व ऐश्वर्या आप्पासो आवटी (वय-८, रा. माधवनगर, सांगली) अशी मृत बालकांची नावे आहेत. ही दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली.
आरवडे-गोटेवाडी रस्त्यालगत असणाऱ्या मस्के वस्ती येथे शौर्य व ऐश्वर्या हे नेहमीप्रमाणे घराबाहेर खेळत होते. दुपारी ३ वाजताच्या सुमारास दोघेही घराबाहेर दिसेनासे झाल्याने कुटुंबियांनी आसपासच्या घरांमध्ये शोधायला सुरुवात केली. मात्र ते दोघे सापडले नाहीत.
यानंतर काही नातेवाईक घरामागे असलेल्या शेततळ्याकडे शोधायला गेले असता शेततळ्याजवळ मोबाईल पडलेला दिसला. दोन्ही मुले पाण्यामध्ये घसरून पडल्याचा संशय आल्याने तरुणांनी तातडीने पाण्यात उड्या टाकून शोध सुरू केला. काही वेळातच शेततळ्यात दोन्ही बालकांचे मृतदेह सापडले. तात्काळ त्यांना पाण्याबाहेर काढून तासगाव येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
यापैकी ऐश्वर्या ही माधवनगर येथील नातेवाईकांच्या घरातून आरवडे येथे काही दिवसांपूर्वी आली होती. घटनास्थळी कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. शौर्य हा आईवडिलांना एकुलता एक होता, तर ऐश्वर्या हिला दोन लहान भाऊ आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लहानग्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या राज्यात अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचंच अशा घटनांनंतर अधोरेखित होत आहे.