शिर्डी | शासननामा न्यूज ऑनलाईन
Shirdi Triple Murder: एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पत्नी, मेव्हणा आणि आजे सासूची जावयानेच धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण हत्या केली आहे. तसेच जावयाच्या हल्ल्यात सासू, सासरे आणि मेव्हणी गंभीर जखमी झाली आहे. शिर्डीपासून (Shirdi Crime) जवळच असलेल्या सावळीविहीर गावात बुधवारी रात्री उशीरा ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी सुरेश निकम याला पोलिसांनी अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
चांगदेव गायकवाड हे त्याच्या कुटुंबासह सावळीविहीर गावातील विलासनगर परिसरात राहतात. बुधवारी रात्री उशीरा त्यांचा जावई आणि आरोपी सुरेश निकम हा घरी आला. कोणाला काही समजण्याच्या आत आजे सासूवर चाकूने सपासप वार केले. आजीवर हल्ला झाल्याचे पाहात पत्नी वर्षा आणि मेव्हणा रोहित पुढे आला असता त्यांच्यावरही आरोपीने चाकुने सपासप वार केले. तिघांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने त्याचे सासरे, सासू आणि मेव्हणीवरही चाकूने वार केले. या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
चाकू हल्ला केल्यानंतर आरोपी सुरेश निकम आणि त्याचा चुलत भाऊ रोशन हे दोघे घटनास्थळावरुन पसार झाले होते. पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवून नाशिक जिल्ह्यातून मारेकरी सुरेश निकम आणि त्याचा चुलत भाऊ रोशन निकमला अटक केली आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाची पाहणी केली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
कौटुंबिक वादातून घडले हत्याकांड
आरोपी सुरेश निकम आणि त्याची पत्नी वर्षामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होता. पती आपला छळ करतो, अशी तक्रारही वर्षाने पोलिसांत नोंदवली होती. तेव्हापासून ती माहेरी राहत होती. पत्नी नांदायला येत नाही, याचा राग सुरेश निकमच्या डोक्यात होता आणि याच रागातून सुरेशने पत्नीसह तिचा भाऊ आणि आजीची निर्घृण हत्या केली.
जावयाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले चांगदेव गायकवाड त्यांची पत्नी आणि मुलगी योगिता जाधव या तिघांवर शिर्डी साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.