नागपूर : चुलत काकावर असलेल्या रागातून एका १५ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या (Nagpur Murder Case) करण्यात आली आहे. राज उर्फ मंगलू चंदन पांडे (वय १५, रा. इंदिरा मातानगर, रायसोनी कॉलेजमागे) असं मृत मुलाचे तर सुरज रामभाऊ शाहू (वय २०,रा. सीआरपीएफ गेटजवळ) असं आरोपीचं नाव आहे. चुलत काकाची हत्या करून त्याचे कापलेले शीर दाखवा तरंच तुमच्या मुलाला सोडेन अन्यथा त्याला ठार मारेन, अशी विचित्र धमकी सुरजने राजच्या कुटुंबियांना दिली होती.
ही धक्कादायक घटना शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. राज हा त्याच्या कुटुबियांसह इंदिरा मातानगर परिसरात राहतो. त्याचे वडील एका खासगी कंपनीत ऑपरेटर म्हणून काम करतात. त्याला मोठी बहीण आणि लहान भाऊ आहे. या वस्तीच्या जवळच असलेल्या सीआरपीएफ गेट परिसरात आरोपी सुरज राहतो. सुरज पांडे कुटुंबियांना तसेच त्यांच्या नातेनाईकांनासुद्धा ओळखतो. राजच्या घराच्या जवळच त्याचे चुलत काका मनोज पांडे राहतात. सुरजचा मनोजवर राग होता. त्यामुळे सुडाच्या भावनेतून राजचे अपहरण करून त्याची हत्या केली अशी माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. सुरजने ‘सर्जिकल ब्लेड’ने राजच्या हाताच्या नसा कापल्या आणि त्याचे डोके दगडाने ठेचून त्याची हत्या केली. सुरजच्या मागणीने आणि त्याच्या क्रुरतेने पोलिसही हादरले आहेत.
क्रिकेटच्या बहाण्याने केले अपहरण
राजला क्रिकेटचे वेड होते. क्रिकेट खेळण्यासाठी तो कुठेही जात असे. त्याच्या वडिलांनी काही महिन्यांपूर्वीच त्याला क्रिकेटचे कीटही घेऊन दिले होते. ही बाब आरोपी सुरजने हेरली. त्याने त्याला दोन दिवसांपूर्वीच सांगितले की आपल्याला क्रिकेट खेळायला जायचे आहे. त्यानुसार सुरजने संध्याकाळी सहाच्या दरम्यान राजला फोन केला. फोन येताच राज खेळायला जातो असे सांगून घराबाहेर पडला तो परतलाच नाही.
‘मनोजचे मुंडके दाखवा’
क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने सुरज राजला घेऊन गेला. दरम्यान राज त्याच्या मित्रांच्या संपर्कात होता. ‘मी दहा मिनिटात मैदानात येतो’, असे त्याने सांगितले. मात्र, पुढे त्याच्या मित्रांशी त्याचा संपर्क तुटला. मात्र, सुरज त्याला मैदानावर नाही तर हुडकेश्वर खुर्द येथे झुडपात घेऊन गेला. रात्री साडे सातच्या सुमारास राजच्या मोबाइलवरून त्याच्या आईच्या मोबाइलवर कॉल आला. यावेळी राज जोरजोरात रडत होता. सुरज आपल्याला मारहाण करीत असल्याचे तो सांगत होता. पुढे सुरजने राजचा फोन हाती घेतला ‘मेरी तुमसे या तुम्हारे लडके से कोई दुश्मनी नही है, मुझे बस मनोज का कटा हुआ सर दिखाओ, मै तुम्हारे लडके को छोड दुंगा,’ असे तो सांगत होता. पांडे कुटुंबियांशी त्याची पाच सहा फोनवरून चर्चा झाली. दरवेळेस तो मनोजचे कापलेले शीरच मागत होता. त्यानंतर त्याने राजची हत्या केली. राजच्या मोबाइल फोनची विल्हेवाट लावली आणि स्वत: घटनास्थळावरून पळून गेला. इकडे पोलिस राजसह सुरजचाही मोबाइल ट्रॅक करीत होते. त्यामुळे काही वेळातच पोलिसांनी त्याला वर्धा मार्गावरील बोरखेडी परिसरात गाठले.
सुरज म्हणतो आईवर अत्याचार झाला!
मनोजने सहा वर्षांपूर्वी आपल्या आईवर अत्याचार केल्याचे सुरज सांगतो. मात्र, त्याच्या आईने ही बाब फेटाळून लावल्याचे पोलिसांनी सांगितल्याची माहिती काही विश्वसनीय सूत्रांनी दिली. तसेच राजच्या अन्य एका चुलत बहिणीशी सुरजचे प्रेमसंबंध होते असे सांगितले जात आहे. मनोजचा याला विरोध होता. यावरून त्याने वर्षभरापूर्वी सुरजला मारहाण केल्याचे कळते. तसेच काही महिन्यांपूर्वी सुरजचा अपघात झाला. हा अपघातसुद्धा मनोजनेच घडवून आणला असे सुरज सांगत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुरजच्या आरोपात किती तथ्य आहे हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे मात्र त्याचा मनोजवर राग होता हे स्पष्ट होते.
निष्पापाला का मारलं?
या घटनेमुळे संपूर्ण पांडे कुटुंबीय हादरले आहे. निशब्द आई, रडून रडून हवालदील झालेली बहीण, किशोरवयीन मुलगा गमावल्याने कोसळलेले वडील आणि नातवाच्या मृत्युच्या वार्तेने उध्वस्त झालेले राजचे आजोबा यांना अजूनही आपल्या निष्पाप लेकराचा गुन्हा कळत नाही. पांडे कुटुंबियांनी सुरजपुढे खूप गयावया केली. त्यांनी त्याला अनेकदा फोन केले. ‘आमच्या लेकराने तुझे काय बिघाडले आहे? तुझा वाद मनोजशी आहे, तो तर मनोजचा मुलगा नाही, कृपा करून त्याला सोड’ अशा विनवण्या केल्या. मात्र सुरजवर त्याचा काहीच फरक पडला नाही.
दरम्यान, शुक्रवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात राजवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हत्येसाठी वापरले ‘सर्जिकल ब्लेड’
राजच्या हत्येमागील कारणे ऐकून सुरज वेडसर वाटत असला तरीसुद्धा त्याने केवळ रागाच्या भरात हा खून केलेला नसून हत्येसाठी कट रचल्याचं लक्षात येते. आपल्याला क्रिकेट खेळायला आहे हे त्याने राजला दोन दिवसांपूर्वीच सांगितले होते. तसेच त्याने हत्येसाठी ‘सर्जिकल ब्लेड’ वापरले आहे. त्यामुळे ही एक थंड डोक्याने केलेली हत्या असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.
[ad_2]