हायलाइट्स:
- करोनाने बेजार सिंधुदुर्ग जिल्हा स्तर चारमध्ये.
- जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंधांबाबत जारी केला आदेश.
- किराणा दुकाने सायंकाळी ४ वाजेपर्यंत खुली राहणार.
सिंधुदुर्ग: (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोविड बाधित रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर १२.७० टक्के इतका असून ६६.५६ टक्के ऑक्सिजन बेड्स सध्या व्यापलेले आहेत. यामुळे जिल्ह्याचा समावेश सध्या चौथ्या स्तरामध्ये करण्यात आला असून त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी निर्बंधांबाबतचा आदेश जारी केला आहे. हा आदेश सोमवारपासून लागू केला जाणार आहे. या आदेशानुसार जिल्ह्यातील संचारबंदी कायम राहणार असून अत्यावश्यक सेवेशी संबंधित आस्थापना आणि दुकाने दररोज दुपारी चार वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मुभा राहणार आहे.
राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा स्तर चारमध्ये येत असल्याने राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सोमवार ते शुक्रवार सायंकाळी पाच वाजल्यानंतर कोणत्याही कारणास्तव संचार करण्यास पूर्णपणे मनाई राहणार आहे. आठवड्याच्या शेवटी शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक वैद्यकीय कारणांशिवाय बाहेर संचार वा प्रवास करता येणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे. हा आदेश ७ जूनपासून पुढील आदेशापर्यंत अमलात राहणार आहे. निर्बंध काही प्रमाणात शिथील केले जात असताना कोविड नियमांचे पालन बंधनकारक असेल असेही बजावण्यात आले आहे.
अशा आहेत गाइडलाइन्स:
– अत्यावश्यक सेवेशी संबंधित सर्व दुकाने आणि आस्थापना सर्व दिवशी दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील.
– अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील.
– मॉल्स, सिनेमा हॉल, नाट्यगृह बंद राहतील.
– रेस्टॉरंट्सना फक्त पार्सल सेवा देण्याची परवानगी असेल.
– सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, वॉकिंग, सायकलिंग यासाठी सोमवार ते शुक्रवार सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत अशी वेळ असेल. शनिवार व रविवार बंद राहतील.
– शासकीय, खासगी आस्थापना व कार्यालये २५ टक्के उपस्थितीसह सुरू राहतील.
– मैदानी खेळांना सोमवार ते शुक्रवार सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत परवानगी असेल. शनिवार, रविवार बंद राहतील.
– चित्रीकरणास सोमवार ते शुक्रवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरक्षित आवरणामध्ये (Bubble) परवानगी असेल. ज्यात गर्दी होईल असे चित्रीकरण प्रतिबंधीत असेल. शनिवार व रविवारी चित्रीकरण करता येणार नाही.
– धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक करमणुकीचे कार्यक्रम वा मेळावे यांना मनाई असेल.
– लग्नसमारंभ जास्तीत जास्त २५ जणांच्या उपस्थितीत पार पाडावा.
– अंत्ययात्रा वा अंत्यविधीला जास्तीत जास्त २० जण उपस्थित राहू शकतात.
– बैठका, निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा ५० टक्के क्षमतेसह घेता येतील.
– ज्या ठिकाणी कामगारांच्या राहण्याची सोय असेल अशा बांधकामास परवानगी.
– कृषी व कृषी पुरक सेवा सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
– फक्त अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या ई कॉमर्स सेवा सुरू राहतील.
– व्यायामशाळा, केशकर्तनालय, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्स ५० टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच सेवा देणे बंधनकारक असेल. ग्राहकांनी वेळ घेऊन यावे व एसी बंद ठेवणे अशा अटी असतील.
– सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतीत बससेवा ५० टक्के क्षमतेसह सुरू राहील. प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.
– खासगी वाहने, टॅक्सी, बसेस, लांब पल्ल्याच्या रेल्वेद्वारे आंतरजिल्हा प्रवास नियमित सुरू राहील. या वाहनातून प्रवास करून स्तर पाच मधील जिल्ह्यातील थांब्यावर उतरणार असल्यास प्रवाशाकडे ई-पास असणे बंधनकारक.
– मालवाहतूक नियमितपणे सुरू राहील.