सोलापूर : (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन
इन्स्टाग्रामवर चाइल्ड पोर्नोग्राफीचा व्हिडिओ अपलोड करणाऱ्या तरुणास सोलापूर सायबर सेलच्या पथकाने अटक केली आहे. मनीष विजयराज बंकापुरे (वय २३, रा. पूर्व मंगळवार पेठ, कोंतम चौक) असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचं नाव असून तो इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे.
सदरच्या व्हिडिओ संदर्भात दिल्लीत आक्षेप घेण्यात आल्याने मुंबईच्या कफ परेड येथील महाराष्ट्र सायबर विभागाच्या पोलिस उपमहानिरीक्षकांकडून विविध सॉफ्टवेअरद्वारे पडताळणी करण्याकरता एक कॉम्पॅक्ट सीडी सोलापूरचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलला देण्यात आली होती.
सायबर पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले तांत्रिक कौशल्य वापरत प्राप्त सीडीमधील अज्ञात आरोपीचा शोध घेण्याकरिता विविध सॉफ्टवेअरद्वारे माहितीचे विश्लेषण करुन आरोपी बंकापुरे याला अटक केली आहे. तो इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असताना त्याने हा व्हिडिओ अपलोड केला होता. त्याने ज्या मोबाईलद्वारे चाइल्ड पोर्नोग्राफीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता, त्यासह त्याच्याविरुध्द पोलिस नाईक बाबूराव मंगरुळे यांनी सरकारतर्फे माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६७ (ए) प्रमाणे तक्रार नोंदवली आहे.
जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे, फौजदार राणा बायस, नागेश होटकर तसेच पोलिस कर्मचारी संतोष येळे, सचिन गायकवाड, मंगरुळे, अमोल कानडे, करण माने, इब्राहिम शेख, वसीम शेख, प्रवीण शेळकंदे, प्रांजली काळे, पूजा कोळेकर आदींनी केली.