मुंबई – राज्य सरकारने साखर उद्योगाच्या इतिहासात पहिल्यांदाच साखर कारखान्यांच्या बाबतीत जाहीर आणि ठोस भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या 44 कारखान्यांची यादी साखर आयुक्तालयाकडून जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये शेतकऱ्यांचा एफआरपी वेळेवर न देणे, वजन करताना शेतकऱ्यांची फसवणूक करणे असे विविध आरोप संबंधित कारखान्यांवर लावण्यात आले असून या कारखान्यांना लाल यादीत समाविष्ट केले आहे. विशेष म्हणजे राज्यातील अनेक आजी माजी राजकीय पुढारी या कारखान्याचे संचालक आहेत.
संबंधित कारखान्यांवर शेतकऱ्यांचा एफआरपी वेळेवर न देणे, वजन करताना शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे येथून पुढे शेतकऱ्यांनी संबंधित कारखान्यांना ऊस घालताना ही यादी लक्षात ठेवावी, असे आवाहनही साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले आहे.
पंकजा मुंडे, सुभाष देशमुख, हर्षवर्धन पाटील, समाधान औताडे, भालके, विजयसिंह मोहिते पाटील अशा दिग्गज नेत्यांचे कारखाने देखील लाल यादीत समाविष्ट केले आहेत. आयुक्तांकडून शेतकरी हिताची भूमिका घेतल्याने शेतकरी संघटनांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.