Home महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र साताऱ्यात निर्बंध शिथिल; महाबळेश्वर-पांचगणी ही पर्यटनस्थळे खुली

साताऱ्यात निर्बंध शिथिल; महाबळेश्वर-पांचगणी ही पर्यटनस्थळे खुली

0
साताऱ्यात निर्बंध शिथिल; महाबळेश्वर-पांचगणी ही पर्यटनस्थळे खुली

सातारा: महाबळेश्वर -पाचगणी ही राज्याची पर्यटनस्थळे अनेक दिवसांच्या टाळेबंदीनंतर पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. मात्र येथे येणाऱ्या पर्यटकांची दांडेघर नाक्यावर रॅपिड अ‍ॅन्टीजेन तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती वाईच्या प्रांताधिकारी संगिता राजापुरकर -चौगुले यांनी महाबळेश्‍वर येथील हिरडा विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत दिली. या वेळी तहसीलदार सुषमा चौधरी पाटील व माजी नगराध्यक्ष डी.एम बावळेकर उपस्थित होते. साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी टाळेबंदीच्या नियमात शिथिलता देऊन काही निर्बंध उठविले आहेत. यानुसार शनिवार (दि.१९) सकाळपासून महाबळेश्वर व पांचगणी ही दोन्ही पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत.

दरम्यान, टाळेबंदीच्या नियमात कशा प्रकारे शिथिलता देण्यात आली असल्याची माहिती देण्यासाठी वाईच्या प्रांताधिकारी संगिता राजापुरकर चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली महाबळेश्वर येथील विविध संघटनांचे प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

गेले ६४ दिवस अत्यावश्यक सेवेत समावेश नसलेली दुकाने बंद होती. मात्र पॉझिटिव्हीटी कमी झाल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शुक्रवारी लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले. शनिवार व रविवारी वीकेंड लॉकडाऊन सुरू राहणार असून यात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. तर सोमवार ते शुक्रवारी अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ६४ दिवसांनी बाजारपेठा खुल्या होणार असल्याने व्यापाऱयांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी आलेल्या ७१६ जण बाधित असून पॉझिटिव्हीटी ६.८५ टक्के आहे. तर ८१० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सकाळी ५ ते सायंकाळी ५ जमावबंदी कायम

कोविड रुग्णांचा पॉझिटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडस् टक्केवारीच्या निकषानुसार जिल्हय़ाचा तिसऱया स्तरामध्ये समाविष्ट झाला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी निर्बंध शिथिल केले आहेत. शनिवारी व रविवारी वीकेंड लॉकडाऊन असल्याने बाजारपेठा सोमवारी 21 रोजी उघडणार आहेत. आठवडय़ात सर्व दिवशी सकाळी 5 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी 5 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचार बंदी लागू करण्यात येत आहे. त्यामुळे संचारबंदीच्या वेळेत वैध कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीस संचार करण्यास मनाई करण्यात येत आहे.



शाळा बंद पण दुकाने निर्धारित वेळेत सुरू

जिल्हय़ातील सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद राहतील. तथापि, ऑनलाईन शिक्षण सुरू असेल. वैद्यकीय महाविदयालये, नर्सिंग कोर्सेस चालू असतील. अत्यावश्यक बाबीची दुकाने, आस्थापना आठवडय़ात सर्व दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असेल. मात्र मेडिकल, औषधांची दुकाने सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत चालू राहतील. हॉस्पीटलमधील मेडिकल, औषधांची दुकाने पुर्णवेळ चालू राहतील. अत्यावश्यक नसलेली दुकाने,आस्थापना ही सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असेल. मॉल, सिनेमागृहे, नाटय़गृहे पूर्णपणे बंद राहतील.

हॉटेल ५० टक्के क्षमतेने सुरू

सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ४ या वेळेत हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी असेल. आठवडय़ाच्या सर्व दिवशी सकाळी ७ते रात्री ८ या कालावधीत घरपोच पार्सल सेवेस परवानगी असेल. लॉजिंग, बोर्डींगला परवानगी असेल.

व्यायाम करा फक्त सकाळी तीन तास

सार्वजनिक जागा, खुली मैदाने, चालणे, सायकलसाठी आठवडय़ाचे सर्व दिवशी सकाळी ५ ते सकाळी ९ या वेळेत परवानगी असेल. सर्व खासगी कार्यालये सायंकाळी ४ पर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. शासकीय, निमशासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी आहे. कोणत्याही क्रीडा स्पर्धा आयोजित करणेस मनाई असेल. आयसोलेशन बबलमध्येच चित्रीकरण व वास्तव्य करणे बंधनकारक राहील. गर्दीचे व गर्दी होईल, असे चित्रीकरण करता येणार नाही.



धार्मिक स्थळे बंदच…मेळाव्यांनाही बंदी

सामाजिक सांस्कृतिक, धार्मिक स्थळे, करमणूक कार्यक्रम, मेळावे बंद राहतील. तथापि सेवेकरी यांना त्यांच्या सेवा करता येतील. बाहेरील भक्तांस प्रवेश असणार नाही. शासकीय कार्यक्रम जागेच्या ५० टक्के क्षमतेने आयोजीत करण्यास परवानगी असेल.

लग्न उरका २५ माणसातच

प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजीत करण्यास मनाई आहे. ते वगळून इतर क्षेत्रात लग्न समारंभ दोन तासाच्या कालावधीत २५ लोकांच्या मर्यादे आयोजन करण्याकामी तहसिलदारांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. अटींचे उल्लंघन झाल्यास प्रथम २५ हजार व दुसऱया वेळी १ लाख रूपये दंड व फौजदारी कारवाई तसेच लग्न मालकास २५ हजाराचा दंड आकारला जाईल.

अंत्यविधीसाठी फक्त २० लोकांना परवानगी

अंत्यविधी व दशक्रिया विधी जास्तीत जास्त २० जणांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी असेल. स्थानिक संस्था, सहकारी संस्थाच्या सर्वसाधारण सभा ठिकाणाच्या ५० टक्के क्षमतेने घेण्यास परवानगी असेल. सर्व बांधकामांना परवानगी असेल. शेतीविषयक दुकाने सर्व दिवस सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. ई-कॉमर्सच्या वस्तू तसेच सेवा नियमितपणे सुरू राहतील.



व्यायामशाळा, सार्वजनिक बसेस सुरू

व्यायामशाळा, केश कर्तनालय, सौदर्य केंद्रे, स्पा, वेलनेस सेंटर ही आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सायंकाळी ४ पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी राहील. सार्वजनिक परिवहन बसेस सेवा या १०० टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी राहील. खाजगी वाहने, टॅक्सी, बसेस, लांब पल्ल्याच्या रेल्वे द्वारे प्रवाशांचा आंतर जिल्हा प्रवास नियमीत सुरु राहील.

सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग ज्यांना निर्यात बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता आहे, अशा यंत्रणा नियमितपणे चालू ठेवण्यास परवानगी असेल. राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण यांचे अनुषंगाने महत्वाच्या घटकाची निर्मिती करणारे उद्योग, डाटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर, आयटी क्षेत्रातील गंभीर पायाभूत सुविधांना सहाय्य करणारे प्रदाता अशा यंत्रणा नियमितपणे चालू ठेवण्यास परवानगी असेल. शिवभोजन थाळी योजना चालू ठेवण्यास परवानगी असेल. स्तर पाचमध्ये समाविष्ठ असलेल्या जिल्हय़ामधून येणाऱया प्रवाशांना वैयक्तीक स्वतंत्र पास असणे आवश्यक आहे.

अत्यावश्यक सेवांमध्ये खालील बाबींचा समावेश

रुग्णालये, निदान केंद्रे, दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा व सदर सेवा पुरविणारी उत्पादक केंद्रे, वाहतूक, लस, सॅनिटायझर, मास्क व वैद्यकीय उपकरणे, व्हेटरिनरी हॉस्पिटल्स, ऍनिमल केअर शेल्टर्स व पेट फुड शॉप्स, वनाशी संबंधित सर्व कामकाज, कोल्ड स्टोरेज आणि गोदाम सेवा, किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी कन्फेक्शनरी, मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादींची सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here