लोणंद : वीर (ता. पुरंदर) धरणाचे शनिवारी (दि. 24) पाच दरवाजे चार फुटाने उचलून 21505 क्युसेकने नीरा नदी पात्रात सोडण्यात आले होते. दुपारी तीन वाजता धरणातून 13 हजार 104 तर विद्युत गृहातून 800 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.
वीर धरणातून एकूण 13 हजार 904 क्युसेकने पाणी नीरा नदी पात्रात सोडण्यात आले असल्याचे सहायक अभियंता विजय नलावडे, शाखा अभियंता लक्ष्मण सुद्रिक यांनी सांगितले.
धरणात शुक्रवारी (दि. 23) येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे शनिवारी पहाटेपासून धरणात विसर्ग सुरू करण्यात आला. दुपारी पाण्याची आवक कमी झाल्याने विसर्ग कमी करण्यात आला.
नीरा नदीवरील धरण साखळी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. पाणलोट क्षेत्रात अनेक ओढ्याचे पाणी नदीपात्रात येत आहे. गुंजवणी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू
असून वेळवंडी व कानंदी नद्यांमधून मोठ्या प्रमाणात नीरा नदीपात्रात पाणी येत आहे. येणारा प्रवाह असाच सुरू राहिल्यास नदी पात्रात आणखी विसर्ग वाढवण्यात येणार आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहा दिवस आधी वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला असल्याचे संभाजी शेडगे, अरुण भोसले, कालिदास तावरे यांनी सांगितले.
धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता आणखी विसर्ग वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.