नागपूर: (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन
नागपूरच्या दोन विद्यार्थ्यांचा रामटेकमधील अंबाळा तलावात बुडून मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. निसर्ग प्रभाकर वाघ (१८ रा.सेमीनरी हिल्स) व कुणाल अशोक नेवारे (वय १८ ,रा.रवीनगर), अशी मृतांची नावे आहेत निसर्ग आणि कुणाल दोघेही बारावीत शिकत होते. (Two Nagpur students drown in Ambala lake)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निसर्ग याचे वडील विस्तार अधिकारी आहेत. बुधवारी सकाळी कुणाल, निसर्ग व त्याचे अन्य चार मित्र मॉर्निंग वॉकला जात असल्याचे सांगून सकाळी कारने नागपूरहून रामटेक येथे आले. ते दर्शनाला जात होतो. मात्र कोव्हिडमुळे मंदिर बंद असल्याचे पोलिसांनी त्यांना सांगितले. त्यानंतर सहा जण जंगल मार्गाने अंबाळा तलाव येथे आले.
सहा पैकी चार जण तलावात आंघोळीसाठी उतरले. मात्र कुणाल व निसर्ग हे दोघे तलावात बुडाले. अन्य दोघे सुदैवाने बचावले. एका नागरिकाला ते दिसले. त्याने रामटेक पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच रामटेकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी शोध घेतला असता निसर्ग याचा मृतदेह आढळून आला. रात्र झाल्याने पोलिसांनी शोध मोहीम थांबविली.
उद्या, गुरूवारी पुन्हा शोध मोहीम राबविण्यात येईल. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.