पुणे : पुणे शहरात करोनाची दुसरी लाट ओसरली असून आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा कमी झाला आहे. अशातच पुणे महानगरपालिकेनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजना (आयुष्यमान भारत) लागू असलेल्या शहरातील १० मोठ्या रूग्णालयांमध्ये महापालिकेची ‘शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना’ आता बंद करण्यात आली आहे. या संबंधीचे परिपत्रक महापालिकेने संबंधित रुग्णालयांना पाठवलं आहे.
करोनाबाधितांची संख्या कमी झाल्यानंतर महापालिकेतर्फे शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेचा आढावा घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील काही रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि पंतप्रधान जन आरोग्य योजना (आयुष्यमान भारत) या दोन्ही योजना लागू होत्या. त्याचबरोबर काही रुग्ण या दोन्ही योजनांसोबत शहरी गरीब योजनेचाही लाभ घेत असल्याचे समोर आले होते.
त्यामुळे या रुग्णालयांमध्ये शहरी गरीब कार्डधारकांना यापुढे लाभ मिळणार नाही. या दोन्ही योजनांचा लाभ संबंधितांना मिळत असल्याने त्याऐवजी अन्य गरजू लाभार्थ्यांना ही मदत दिली जाईल, असे महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार अंशदायी वैद्यकीय साह्य योजना समितीने हा निर्णय घेतला आहे.
या १० रुग्णालयांमध्ये बंद झाली योजना
एम्स रुग्णालय- औंध, भारती रुग्णालय -कात्रज, देवयानी रुग्णालय-कोथरूड, गॅलॅक्सी रुग्णालय-कर्वे रस्ता, ग्लोबल रुग्णालय-दत्तवाडी, पवार मल्टिस्पेशालिटी रुग्णालय-खराडी, राव रुग्णालय-बिबवेवाडी, ससून रुग्णालय-पुणे स्टेशन, श्री रुग्णालय-शास्त्रीनगर, सह्याद्री सूर्या रुग्णालय- कसबा पेठ या रुग्णालयांमधील शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना बंद करण्यात आली आली