मुंबई: ३० ते ४४ या वयोगटासाठी लसीकरण करण्याची मुभा केंद्र सरकारने राज्यांना दिल्यानंतर राज्य शासन आज १९ जूनपासून राज्यात ३० ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करत आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेसोबतच ४५ वर्षांवरील नागरिंकाचा लसीकरण कार्यक्रम नियमीत सुरू राहणार आहे. ही माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. (Vaccination for citizens in the age group of 30 to 44 in the state from today)
आज पासून शासकीय केंद्रावर सुरू होत असलेल्या लसीकरणासाठी ऑनलाइन पद्धतीने पूर्वनोंदणीही करता येणार आहे, शिवाय प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन देखील लस घेता येणार आहे. या लसीकरण मोहीमेत १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरवण्याची मुभा केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिली आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणाच्या सुनियोजित वयोगटाचा टप्पा निश्चित केला आहे. त्याप्रमाणे आज शनिवारी १९ जून पासून ३० ते ४४ या वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
कोविन अॅपमध्येही आवश्यक ते बदल
३० ते ४४ या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सत्रांचे नियोजन करण्यासाठी कोविन अॅपमध्ये देखील आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत.
राज्य शासनाच्या या लसीकरणा मोहीमेमुळे राज्यातील अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण होणार असून राज्य शासन लसीकरणाचे ठरवलेले लक्ष्य गाठण्यासाठी वेगाने वाटचाल करणार आहे.
केंद्र सरकारने राज्यांना लसीकरणाची मुभा दिल्यानंतर १ मेपासून पुण्यासह राज्यात १८ ते ४४ वयोगटाचेही लसीकरण सुरू करण्यात आले होते. परंतु, राज्याला लशीच्या तुटवड्याचा सामना करावा लागला होता. त्यामुळे राज्य शासनाने १३ मे पासून या वयोगटाचे लसीकरण तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आजपासून पुन्हा ३० ते ४४ वयोगटासाठीचे लसीकरण सुरू होत आहे.