मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एकीकडे खासदार संभाजी राजे यांनी राज्यव्यापी दौरे सुरू केले असताना दुसरीकडे शिवसंग्राम सेनेचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी जनजागृती करण्याची मोहीम आखली आहे. मेटे यांनी जनजागृती मोहिमेअंतर्गत येत्या २७ जून रोजी मुंबईत दहा हजार मोटर सायकलींची रॅली आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
मेटेंची राज्य सरकारवर टीका
विनायक मेटे पुण्यात प्रसामाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. आपल्या जनजागृती अभियानाची माहिती देताना विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीवारी करून लोकांचा वेड्यात काढले असल्याचे मेटे यांनी म्हटले आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी निष्क्रियतेचा आरोप लावला. सुप्रीम कोर्टाने ५ मे रोजी मराठा आरक्षण रद्द केले. त्यानंतर एक महिन्याचा कालावधी उलटून गेला, तरी देखील सरकारने अद्याप फेरविचार याचिका दाखल केलेली नाही, असे सांगताना यापेक्षा दुसरा निष्क्रियापणा कोणता असू शकतो, असा सवाल मेटे यांनी उपस्थित केला आहे.
आम्ही जे काही ५ तारखेपासून सांगत आहोत ते ऐकलेच जात नाही. माजी न्यायमूर्ती भोसले यांच्या समितीने जे काही सांगितले ते देखील ऐकले जात नाही, असे सांगत याचाच अर्थ सरकारला मराठा आरक्षणाशी काही देणेघेणे नाही, केवळ दिल्लीची वारी करून उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांनी लोकांना वेड्यात काढले आहे असे मेटे म्हणाले.
दिल्ली भेटीत मराठा आरक्षणाचा विषय त्यांना फक्त तोंडी लावायचा होता. राज्यात मराठा समाजाच्या मनात रोष वाढत चालल्याचे दिसल्यानंतर ही दिल्लीवारी झाली. काही तरी करत आहोत हे दाखवण्यासाठीच ही भेट होती. प्रत्यक्षात मात्र मराठा समाजासाठी काहीही केले गेलेले नाही, अशी टीकाही मेटे यांनी केली आहे.
‘… तर पावसाळी अधिवेशन चालवू देणार नाही’
मराठा आरक्षणासाठी आम्ही तज्ज्ञांच्या बैठका घेणार असून जिल्हानिहाय मेळावे घेत मोर्चेही काढणार असल्याचे मेटे म्हणाले. तसेच भोसले कमिटीप्रमाणे कायदेतज्ज्ञांची समितीही आम्ही स्थापन करणार असल्याचे ते म्हणाले. मराठा समजाच्या मागण्या सरकारने मान्य केल्याच पाहिजेत अन्यथा आम्ही पावसाळी अधिवेशन चालवू देणार नाही, असा इशाराही मेटे यांनी दिला आहे.