मुंबई, 07 जून: (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन
केरळात मान्सून (Monsoon in Kerala) दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत मान्सूनने मोठा पल्ला गाठत महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवर (Monsoon in Maharashtra) धडक मारली आहे. त्यानंतर आता पुन्हा मान्सूनचा वेग काहीसा मंदावला आहे. काल मान्सूनने पुण्यासह अलिबाग परिसरात आगमन केलं आहे. त्यामुळे परिसरात तुरळक ठिकाणी चांगलाच पाऊस झाला आहे. दुसरीकडे, नैऋत्य मोसमी वारे वेगाने वाटचाल करत असले तरी बहुतांशी ठिकाणी पाऊस पडत नसल्याचं चित्र आहे. पण पुढील तीन तासांत मुंबईत बहुतांशी ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून (IMD)वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याच्या मुंबई वेधशाळेनं नुकत्याच वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन तासांत मुंबई शहरासह, उपनगरात आणि जिल्ह्यात तुरळक ठिकाणी कमी ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी मोठ्या झाडाच्या आडोशाला उभं राहू नये, असा सल्लाही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
WEATHER INFO- Nowcast warning issued at 0700 Hrs IST dated 07/06/2021 Thunderstorm accompanied with lightning and light to moderate rain likely to occur at isolated places in the districts of Mumbai city and Suburbs, during next 3 hours.
सध्या उत्तर महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तसेच कोकणापासून गोव्यापर्यंत चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांच्या तुलनेत मान्सूनचा वेग किंचितचा मंदावला आहे. पण पुढील काही दिवस मान्सूनची प्रगती रोडावण्याची शक्यता आहे.
कालपर्यंत मान्सूनने महाराष्ट्रातील 30 टक्के भाग व्यापला होता. मागील चोवीस तासांत पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांत मान्सून पावसाने हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनात यावर्षीचा पाऊस दिलासा देणारा असणार आहे. यंदा 101 टक्के पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.