Home महाराष्ट्र “आता कुठे घरातून डिस्चार्ज झाला, आता फिरत आहेत”; नारायण राणे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

“आता कुठे घरातून डिस्चार्ज झाला, आता फिरत आहेत”; नारायण राणे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

0

मुंबई : राज्यात  मागील काही दिवसापासून मुसळधार पावसाने होत्याच नव्हतं केलं आहे. कोकणात तर डोंगराने संपूर्ण गाव आपल्या कवेत घेतले. याच दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी आता सरकार आणि विरोधी पक्ष घटनास्थळी पोहचत आहेत. आज केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी तळीये गावाला भेट दिली. यावेळी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.

“केंद्र सरकारकडून आधीच मदत जाहीर केली आहे. पंतप्रधानांनी मला पाहणीसाठी पाठवलं आहे. त्यांनी मला पाहणी करून अहवाला देण्याचं सांगितलं आहे. सध्या तरी मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. त्याचबरोबर त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम केलं जात आहे,” असं राणे यांनी सांगितलं.

यावेळी राज्य सरकारशी यासंदर्भात काही चर्चा झाली आहे का? असा प्रश्न राणे यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. “राज्य सरकारची लोक भेटत नाहीत, बोलत नाहीत. आता कुठे घरातून डिस्चार्ज झाला आहे. आता फिरत आहेत”, अशा शब्दात राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले.

तळीयेत माध्यमांशी बोलताना नारायण राणे म्हणाले, “अतिशय दुर्दैवी घटना आहे. नैसर्गिक आपत्ती असल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. ४४ मृतदेह सापडले आहेत. इतरांचा शोध घेतला जात आहे. बचाव पथकाचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र आणि राज्याकडून मदत देण्यात आली असली, तरी या मदती पलिकडे आणखी मदत होणार नाही, असं नाही. त्याचं पूनर्वसन पंतप्रधान आवास योजनेतून केलं जाईल. त्यांना चांगली आणि पक्की घरं दिली जातील.

राज्य व केंद्र सरकार दोघंही ही वसाहत पुन्हा उभारतील. एकच गोष्ट अशी जी आम्हाला परत आणता येणार, ती म्हणजे मृत्यू पावलेली माणसं. शासकीय यंत्रणा चांगलं काम करत आहेत. त्यामुळे या आपत्तीतून सुदैवानं जी माणसं वाचली, त्यांना सांभाळण्याचं काम आम्ही करू. या माणसांच्या मागण्यासोडवण्यासाठी स्वतंत्र प्रांत अधिकारी नेमण्याची सूचना केली आहे. काही लोकांनी तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्याची मागणी केलीये. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे पुनर्वसन केलं जाईल”, असे राणे यांनी सांगितले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या नुकसानीची माहिती दिली जाईल. मी येतानाच पंतप्रधानांशी बोललो आहे. त्यांनी मला अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. कोकणात कायमस्वरूपी एनडीआरएफची तुकडी ठेवण्यासंदर्भात केंद्राकडे मागणी करू. आपण असे प्रश्न विचारू नका की त्यातून वाद होईल. या घाटातील डोंगर कोसळेल याची कुणाला तरी कल्पना आली होती का? नाही ना… त्यामुळे कुणावर आरोप करण्याची ही वेळ नाहीये. घडलेल्या घटनेमधील जे दुःखात बुडालेले आहेत. त्यांचे प्रश्न आपण आधी सोडवू. नंतर बाकीचं बघू… वादाचे मुद्दे आतातरी विचारू नका”, असे आवाहन करत राणे यांनी सामंजस्याची भूमिका घेतली.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here