पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच पेटल्याचं दिसतं. मुख्यमंत्र्यांसोबत अजित पवार (Ajit Pawar) आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan)यांनीदेखील पंतप्रधानांची भेट घेतली. एकीकडे या भेटीची चर्चा असताना दुसरीकडे काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole)यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली. यावर ५ वर्ष उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील असं संजय राऊतांनी ठाम सांगितलं. याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार आज सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यातल्या एका कार्यक्रमात महाविकास आघाडीसाठी पुढचे पाच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील की राष्ट्रवादी दावा ठोकेल असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. यावर पुढचे पाच वर्ष महाविकास आघाडी सरकार टिकणार हे पवार साहेबांनी सांगितलं आहे. त्यामुळे एखाद्या विषयावर पवार साहेब बोलले की त्यावर आम्ही कोणीही काही बोलत नाही असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे येत्या काळात मुख्यमंत्री पदावरून आघाडी सरकारमध्ये बिघाडी येते का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
दरम्यान, ‘अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रीपदावर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दावा सांगितला जाईल व तेथे आघाडीत वादाची ठिणगी पडेल. त्या वादातून राज्यात नव्या राजकीय घडामोडींना वेग येईल, असे जे पसरवले जात आहे त्यात काहीच तथ्य नाही. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हा ‘पाच’ वर्षांसाठी दिलेला शब्द आहे’, असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेकडेच राहिल हे स्पष्ट केलं होतं.