Home महाराष्ट्र हृदय उजवीकडं झुकलेलं असल्यानं सैन्य दलानं ठरविलं अपात्र; तरुणाची हायकोर्टात धाव

हृदय उजवीकडं झुकलेलं असल्यानं सैन्य दलानं ठरविलं अपात्र; तरुणाची हायकोर्टात धाव

0
हृदय उजवीकडं झुकलेलं असल्यानं सैन्य दलानं ठरविलं अपात्र; तरुणाची हायकोर्टात धाव

नागपूर : हृदय डाव्या बाजूला नाही तर उजव्या बाजूला झुकलेले असल्याने एका तरुणाला सैन्यदलात भरतीस अपात्र ठरविण्यात आले. या तरुणाने सैन्य दलाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. ही एक दुर्मिळ बाब असली तरीसुद्धा त्याचा शरीरावर फारसा फरक पडत नाही आणि अशाना लोकांना सर्वसाधारण आयुष्य जगता येते. त्यामुळे सैन्य दलाच्या या निर्णयाला आव्हान देणारी एक आगळीवेगळी याचिका एका तरुणाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे.

अजय तितरमारे असे तरुणाचे नाव आहे. साधारणत: आपल्या हृदयाचा वरचा भाग हा डाव्या बाजूला झुकलेला असतो. मात्र, अजयच्या हृदयाचा वरचा भाग हा उजव्या बाजूला झुकलेला आहे. हृदयाच्या या स्थितीला ‘डेक्सट्रोकार्डिया (Dextrocardia) आणि साइटस इनवर्सस’ असे म्हणतात. ही फार दुर्मिळ बाब असून जगातील फारच कमी लोकांच्या हृदयाची स्थिती अशी असते. अजयने काही काळापूर्वी भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रयत्न केले. इतर परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी झाली. यात ही बाब समोर आली. सैन्य दलाच्या वैद्यकीय निकषांनुसार त्याला अपात्र ठरविण्यात आले. मात्र, पुणे येथील ‘कमांड हॉस्पिटल’ने नोंदविलेल्या वैद्यकीय मतानुसार त्याला सैन्यदलासाठी अपात्र घोषित करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याने सैन्य दलाच्या या निर्णयाला आव्हान दिले आहे. न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अनिल किलोर यांच्यासमक्ष या याचिकेवर सुनावणी झाली. अॅड. लक्ष्मी मालेवार यांनी याचिकाकर्त्याची बाजू मांडली. न्यायालयाने याप्रकरणी संरक्षण मंत्रालय आणि सैन्य दलाला नोटीस बजावली असून दोघांनाही आपले उत्तर दाखल करण्याचे आदेश दिलेत.

अमेरिकेने बदलले निकष

‘डेक्सट्रोकार्डिया आणि साइटस इनवर्सस’ही हृदयाची एक दुर्मिळ स्थिती असून ती असामान्य आहे. तथापि, या स्थितीने प्रभावित असलेले बहुतेक जण कोणत्याही प्रकारच्या अपंगत्वाशिवाय सामान्य जीवन जगतात. ही बाब मान्य करीत अमेरिकन सैन्य दलाने आपले निकष बदललेत. अशा स्थितीत भारतीय सैन्य दलाने हे बदल का करू नयेत, असा सवाल या याचिकेद्वारे करण्यात आला आहे. न्यायालयानेसुद्धा या प्रकरणी संरक्षण मंत्रालय आणि सैन्य दलाची बाजू ऐकून घेण्यासाठी त्यांना नोटीस बजावली असून यावर एका आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश दिलेत.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here