सण कोणताही असो प्रत्येक स्त्री त्यासाठी आतुर असते कारण या सणात नटण्या मुरडण्याची आणि आपली हौस भागवण्याची संधी देखील मिळते, नीता अंबानी देखील याला अपवाद नाहीत. त्यांचे फेस्टिव्हल लुक्स अगदीच स्तुती करण्यासारखे असतात. आज आपण खास त्यांच्या अशाच काही लुक्स बद्दल या लेखातून जाणून घेऊ, जेणेकरून तुम्ही देखील हे लुक्स कॅरी करून सर्वांमध्ये उठून दिसू शकता. (Nita Ambani Traditional Looks For Vat Savitri Vrat 2021)
नीता अंबानी यांचे एक खास सिक्रेट
नीता अंबानी या प्रत्येक पूजेला किंवा व्रताला लाल रंगाचे कपडे परिधान करणे पसंत करतात. गरजेचे नसते की त्यांचा पूर्ण पेहरावच लाल रंगाचा असेल पण त्यांच्या कपड्यांमध्ये मंगल प्रसंगी लाल रंगाला विशेष महत्त्व असते. यामागे हे कारण असावे की लाल रंग हा पवित्र मनाला जातो. शिवाय तो सौभाग्य आणि समृद्धीचे देखील प्रतिक आहे. नीता अंबानी यांचा हिंदु संस्कृती आणि भारतीय परंपरांवर जास्त विश्वास आहे. त्या खूप श्रद्धाळू देखील आहेत. त्यामुळेच त्या कोणत्याही सणाला अधिकाधिक लाल रंगाचे कपडे परिधान करणे पसंत करत असाव्यात.
वटसावित्रीला तुम्ही देखील निवडा लाल रंग
देवी लक्ष्मी आणि देवी दुर्गा यांच्या वस्त्रांचा रंग लाल असतो. वटसावित्रीचे व्रत हे पत्नी आपल्या पतीसाठी धरते. म्हणून जर तुम्हाला देखील नीता अंबानी यांच्या सारखे या सणाला तयार व्हायचे असेल तर या पवित्र दिवसासाठी अशा साडीची निवड करा जी लाल रंगाची असेल. जर लाल व्यतिरिक्त अन्य रंगाच्या तुम्ही शोधात असाल तर नारंगी, पिवळा किंवा जांभळा रंग देखील निवडू शकता. हे रंग देखील या सणासाठी परफेक्ट आहेत.
सोळा शृंगार
साडी कोणती नेसायची हे ठरले की पुढील महत्त्वाची गोष्ट असते सोळा शृंगाराची! हे सोळा शृंगार हिंदू पतिव्रतेसाठी पारंपारिक आणि आध्यात्मिक प्रतीके आहेत. म्हणून आपल्या साडीची निवड करून झाली की सर्वात आधी लाल टिकली किंवा कुंकू लावावे. तुम्ही कोणताही सण घ्या आणि त्यात नीता अंबानी यांचा लूक पहा तुम्हाला सर्व लुक्स मध्ये त्या सौभाग्याच्या या दोन प्रतीकांसह आवर्जून दिसतीलच!
गडद रंग नसेल तर
वटसावित्रीच्या दिवशी तुम्ही जी साडी परिधान करणार असाल त्याचा रंग लाल नसेल वा अन्य कोणताही गडद वा उठावदार रंग उपलब्ध नसेल तर तुम्ही अन्य साडी वा ड्रेस परिधान करून त्यावर लाल रंगाची ओढणी घ्यावी. शिवाय हातात लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात. शेवटी जेव्हा तुम्ही लाल टिकली वा कुंकू लावाल तेव्हा तुमचा लूक पूर्ण होईल आणि गडद रंग नसला तरी जास्त फरक पडणार नाही. नीता अंबानी देखील लाईट कलर कधी परिधान केला तर त्यावर लाल ओढणी घेतात, हातात लाल बांगड्या घालतात आणि कुंकू वा लाल टिकली लावून ट्रेडीशनल लूक पूर्ण करतात.
मेहंदीचा साज
या वर्षीच्या वटसावित्रीच्या सणात तुमचा लुक ठरवायला तुमच्याकडे जास्त वेळ नसेल आणि तुम्हाला सणाची सगळी तयारी देखील करायची असेल तर मेहंदी अवश्य काढा. कारण जेव्हा लूक साधा असतो तेव्हा हातावरील मेहंदी तुमच्या लुकला परिपूर्ण करते आणि त्यावर साज चढवते. शिवाय मेहंदी शरीराचे तापमान देखील नियंत्रित करते. नीता अंबानी यांचा कोणताही फेस्टीव्ह लूक तुम्ही पाहिलात तर त्यात देखील तुम्हाला मेहंदी नक्की दिसेल. मेहंदी हा स्त्री सौंदर्याचा अविभाज्य भाग आहे. जी स्त्री मेहंदी काढून येते ती नक्कीच इतर स्त्रियांपेक्षा जस्त लक्ष खेचून घेते.
घरात पूजा करताना
मंदिरात जाऊन वडाच्या झाडाची पूजा केल्यावर जेव्हा तुम्ही घरी याल तेव्हा तुम्ही तुमची हेअरस्टाईल बदलू शकता, या वेळी तुम्ही तुमचे केस मोकळे सोडून त्यावर एखादी हेअर एक्ससेरिज परिधान करू शकता. तुमचे फोटो देखील या लुक मध्ये नक्कीच सुंदर येतील. नीता अंबानी यांचे आयब्रोज खूप सुंदर आणि एकदम परफेक्ट आर्च घेतलेले आहेत. शिवाय त्यांचे आयब्रोज फुलर देखील आहेत. असा लूक मिळवण्यासाठी आयब्रोज वर आय पेन्सिलचा वापर करा. डोळ्यांमध्ये आयलाईनर, मस्कारा आणि आयशॅडो लावून तुम्ही तुमचा लूक अधिक खुलवू शकता.