नवी दिल्ली (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच राष्ट्रीय एकात्मतेचा विचार मांडत आला आहे. मात्र, रा. स्व. संघाविषयी एका गटाने नेहमीच अफवा पसरविल्या. आता संघाचे नेमके स्वरूप जनतेसमोर येत असल्याने ’अफवा गँग’ हवालदिल झाली आहे,” असा टोला केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार आब्बास नक्वी यांनी सोमवार, दि. ५ जुलै रोजी विरोधकांना लगविला.
रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सर्व भारतीयांचा ‘डीएनए’ एक असून देशातील मुस्लिमांनी काल्पनिक भयामध्ये अडकू नये, असे प्रतिपादन केले होते. त्यावर ‘एआयएमआयएम’चे असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली होती. त्यास केंद्रीय मंत्री नक्वी यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “रा. स्व. संघाने नेहमीच हाच विचार मांडला आहे. मात्र, रा. स्व. संघाविषयी देशातील एका गटाने दीर्घकाळपासून नकारात्मक विचार आणि अफवा पसरविल्या आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून संघाचे नेमके स्वरूप सर्वसामान्य जनतेपर्यंत सहजतेने पुढे येत आहे. त्यामुळे ही ’अफवा गँग’ आता हवालदिल झाली आहे. डॉ. भागवत यांच्या विधानाने कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण झालेला नाही,” असेही ते म्हणाले.
रा. स्व. संघाने नेहमीच सद्भाव, बंधुभाव आणि राष्ट्रवादी विचार मांडल्याचे नक्वी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “यापूर्वी संघविचारांवर अफवा वरचढ ठरत असत, कारण संघाने कधीही प्रसिद्धीचा मार्ग अवलंबला नव्हता. मात्र, गेल्या काही काळापासून संघाचे विविध कार्यक्रम देशभरात प्रसारित केले जात आहेत. त्यामुळे जनताच आता अपप्रचार आणि अफवा खोडून काढते. त्यामुळे रा. स्व. संघाचा विचार देशभरात मजबुत होत आहे आणि त्यामुळेच देशातील एक गट अपप्रचार करण्यात आघाडीवर आहे,” असे नक्वी यांनी नमूद केले.