अयोध्या : आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी अयोध्येत राम मंदिराचं निर्माण करणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांनी संस्थेचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या मदतीने दोन कोटी रुपये दराची जमीन 18 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली. त्यांनी सांगितलं की, हे थेट पैशांच्या अफरातफरीचं प्रकरण आहे आणि सरकारने याची सीबीआय आणि ईडीमार्फत तपास करावा.
तर दुसरीकडे समाजवादी पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले आणि अयोध्याचे माजी आमदार पवन पांडे यांनीही चंपत राय यांच्यावर असेच आरोप करत सीबीआय तपास करण्याची मागणी केली आहे.
चंपत राय यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “मी अशाप्रकराच्या आरोपांना घाबरत नाही. माझ्यावर झालेले आरोप मी तपासणार आहे.”
काही मिनिटांत 2 कोटीहून 18 कोटी दर
संजय सिंह यांनी काही दस्तऐवज सादर करत म्हटलं की, “मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या नावावर भ्रष्टाचार आणि घोटाळा करण्याची हिंमत करु शकेल, याची कोणी कल्पनाही करु शकत नाही. राम जन्मभूमी ट्रस्टच्या नावावर चंपत राय यांनी कोट्यवधी रुपये लंपास केले.” अयोध्या तहसीलमध्ये येणाऱ्या बागा बिजैसी गावातील पाच कोटी 80 लाख रुपये किंमतीची जमीन सुलतान अन्सारी आणि रवी मोहन तिवारी या दोन व्यक्तींनी कुसुम पाठक आणि हरीश पाठक यांच्याकडून 18 मार्च रोजी दोन कोटी रुपयांमध्ये खरेदी केली होती, असा दावा संजय सिंह यांनी केला.
आपचे खासदार संजय सिंह म्हणाले की, “संध्याकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी झालेल्या या जमीन व्यवहाराचे साक्षीदार राम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा आणि अयोध्याचे महापौर ऋषिकेश उपाध्याय बनले होते. मात्र त्यानंतर पाचच मिनिटांनी चंपत राय यांनी हिच जमीन सुलतान अन्सारी आणि रवी मोहन तिवारी यांच्याकडून साडे अठरा कोटी रुपयांमध्ये खरेदी केली. त्यापैकी 17 कोटी रुपये आरटीजीएसद्वारे देण्यात आले.”
राजनीतिक विद्वेष से प्रेरित लोग ज़मीन ख़रीद के सम्बंध में समाज को गुमराह करने के लिए भ्रामक प्रचार कर रहें हैं। pic.twitter.com/jfENrubyOp
— Champat Rai (@ChampatRaiVHP) June 13, 2021
“प्रती सेकंद साडे पाच लाख रुपयांनी जमिनीचा भाव वाढला”
त्यांनी आरोप केला की, “दोन कोटी रुपयांमध्ये खरेदी केलेल्या जमिनीचा भाव प्रतिसेकंद जवळपास साडेपाच लाख रुपयांनी वाढला. भारतच काय जगात कुठेही कोणाच्या जमिनीचा भाव एवढ्या वेगाने वाढत नाही. मजेशीर बाब म्हणजे राम मंदिर ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा आणि अयोध्याचे महापौर ऋषिकेश उपाध्याय पहिल्या जमीन व्यवहाराचे साक्षीदार बनले होते, तेच दोघे ही जमीन ट्रस्टच्या नावावर खरेदी करण्याच्या व्यवहारातही साक्षीदार होते. हे थेट पैशांच्या अफरातफरीचं आणि भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारकडे मागणी करतो की, तात्काळ ईडी आणि सीबीआयद्वारे याचा तपास करुन यामध्ये सामील भ्रष्टाचारी लोकांना जेलमध्ये टाकावं. कारण हा देशातील कोट्यवधी रामभक्तांच्या श्रद्धेसोबतच इतर नागरिकांच्या विश्वासाचाही प्रश्न आहे, ज्यांनी आपल्या कमाईतील काही रक्कम राम मंदिराच्या निर्माणासाठी दिले आहेत.”
ते पुढे म्हणाले की, “या प्रकरणात अॅग्रीमेंटचा स्टॅम्प आणि अॅनॉनिमस स्टॅम्पवरही प्रश्न उपस्थित करतात. जी जमीन नंतर ट्रस्टला विकण्यात आली, त्यावरील स्टॅम्प पाच वाजून 11 मिनिटांनी खरेदी करण्यात आली. तर जी जमीन पहिल्यांदा रवी मोहन तिवारी आणि सुलतान अन्सारी यांनी खरेदी केली त्यावरील स्टॅम्प पाच वाजून 22 मिनिटांचा आहे.”