ठाणे (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन
आंतरराष्ट्रीय पातळीवरील ग्लोबल टीचर अवॉर्ड सन्मानित आदर्श शिक्षक आणि स्वामी विवेकानंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील म्हसकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवार दिनांक 25 ऑगस्ट, 2021 रोजी वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ,पाषाणे येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले! यावेळी म्हसकर सर यांना जागतिक स्तरावरील ग्लोबल टीचर अवॉर्ड 2020 हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचा विद्यापीठातर्फे यथोचित सत्कार करण्यात आला तसेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या!
वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष हभप कैलास महाराज निचिते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ओबीसी समाजाचे अध्यक्ष श्री.रविंद्र चंदे, अमरावती येथील मानवसेवा विकास फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश संघटक श्री.व्ही.एस.पाटील सर, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते श्री.प्रकाश गोंधळी सर, मौजे पाली गावचे आदर्श पोलीस पाटील साईनाथ तरणे, शेख सर, स्वामी विवेकानंद संस्थेचे अनंता तरणे, शैलेश तरणे, गीतांजली म्हसकर, आकाश म्हात्रे, सुनीता तरणे अन्य पदाधिकारी आणि आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सुनील म्हसकर सर म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी सत्य, सदाचार, सत्संग, सद्विचार आणि सद्भावना या पंचसूत्रीचा अवलंब करून विविध उपक्रम, स्पर्धा यांच्यात सहभागी व्हावे, विविध कलागुणांनी निपुण व्हावे आणि त्यातून आपले व्यक्तिमत्त्व बहुआयामी करावे! तरच उद्याचा सक्षम व समर्थ नागरिक घडेल.” तर कार्यक्रमाचे अध्यक्ष हभप कैलास महाराज निचिते म्हणाले की, “विद्यार्थी हा निरागस बालक आहे, त्याला योग्य संस्कार, उचित मार्गदर्शन आणि दर्जेदार असे मनःपूर्वक शिक्षण शिक्षकांनी दिले तरच तो भविष्यात सजक, जाणता असा गावाचा पालक होणार आहे! सुनील म्हसकर सरांनी जसे गावाचे नाव जगाच्या पातळीवर नेले तसेच तुम्हीही सौजन्याने वागावे, खूप पुढे जावे!” यावेळी श्री.रविंद्र चंदे, दत्तात्रय भोईर सर, एन. ए. कदम सर यांनी मनोगत व्यक्त केले!
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी सातपुते सर यांनी केले! कार्यक्रम यशस्वीतेसाठी पाषाणे येथील ग्रामस्थ आणि विद्यापीठाच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी मेहनत घेतली! कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून सदर कार्यक्रमात पंचक्रोशीतील नागरिक आनंदाने सहभागी झाले होते.