
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ब्रिटनमध्ये होणार्या जी-7 शिखर परिषदेत व्हर्च्युअली सहभागी होतील. आज त्यांचे यात भाषण होणार आहे. पंतप्रधान मोदींची तीन भाषणे 12 आणि 13 जून रोजी होणार आहेत. पंतप्रधान मोदी हे जी -7 शिखर परिषदेचा भाग होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2019 मध्ये पंतप्रधान मोदी फ्रान्समधील शिखर परिषदेत उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदी तीन भाषणे देतील. त्यांची भाषणे 12 आणि 13 जून रोजी होणार आहेत. या वेळी जी-7 मध्ये कोरोनामुक्त व्यापार आणि पर्यावरण याबद्दल सविस्तर चर्चा होणार आहे. जगाला कोरोना महामारीपासून मुक्त कसे करावे आणि सर्व पातळ्यांवर पुनरागमन कसे करावे यावर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल.
यावेळी जी-7 शिखर परिषद यूकेच्या कॉर्नवॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. 11 ते 13 जून दरम्यान चालणार्या या शिखर परिषदेसाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान मोदींना विशेष आमंत्रित केले होते. तथापि, कोरोनामुळे 11 मे रोजी मोदींनी ब्रिटनला न जाण्याचा निर्णय घेतला होता आणि परिषदेला व्हर्च्युअली संबोधित करण्याचा निर्णय घेतला. भारत हा जी-7 चा भाग नाही, परंतु बोरिस जॉन्सन यांनी अतिथी देश म्हणून भारताला आमंत्रित केले होते. याशिवाय भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि दक्षिण आफ्रिकेलादेखील निमंत्रित करण्यात आले आहे.
जी-7 मध्ये अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, ब्रिटन, जर्मनी, जपान आणि इटलीचा समावेश आहे. सर्व सदस्य देश यामधून वार्षिक शिखर परिषद ठेवतात. 2019 मध्ये ही शिखर फ्रान्समध्ये झाली होती आणि त्यावेळीसुद्धा भारताला अतिथी देश म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. 2020 मध्ये कोरोनामुळे परिषद रद्द झाली होती.
पंतप्रधान मोदींच्या आधी मनमोहनसिंग आणि अटलबिहारी वाजपेयी यांनीही जी-7 मध्ये भाग घेतला होता. दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी 2003 मध्ये सामील झाले होते, तर 2005 ते 2009 दरम्यान मनमोहनसिंग यांना सलग 5 वर्षे जी-7 मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.