मुंबई – यंदाच्या मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातून आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. शिवसेनेची सत्ता यावी आणि शिवसेनेची इच्छा पूर्ण व्हावी असा हा अर्थसंकल्प आहे. रस्ते विकासासाठी बजेट वाढले पण पावसाळ्यात मुंबईला लोक तुंबई म्हणतात.
20 वर्षे हे महापालिकेत सत्तेत आहेत. पण रस्त्यावरुन गाडी जाताना व्हायब्रेट मोडवर जाते. इतर महानगरात जेवढे खड्डे नाहीत त्यापेक्षा जास्त खड्डे मुंबईत आहेत. मुंबई महापालिकेच्या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्र्यांचा फोटो असतो, अशी टीका भरतीय जनता पार्टीचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
मुंबई महापालिकेचा 2022-2023 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी 45 हजार 949 कोटींचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात 17.70 टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी 39 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. महापालिका निवडणुका होऊ घातल्याने निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पातून मुंबईकरांचा आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे. मात्र या अर्थसंकल्पावर मुनगंटीवार यांनी खोचक टीका केली.
शिवसेना मुंबईत पायाभूत सुविधा देण्यात अपयशी ठरली. पेंग्विन आणले तर पर्यटन वाढेल असे वाटत असेल तर आपण कुठेतरी चुकत आहोत. मोठमोठ्या घोषणा झाल्या पण सर्व फोल ठरल्या. मुंबईकरांच्या मनात समाधानाचा अभाव असेल तर त्याला फक्त आणि फक्त शिवसेना जबाबदार आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. इतकंच नाही तर किराणा दुकानात वाईन विकणाऱ्यांना निवडणुकीत मात्र फाईन बसेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.