लठ्ठ मुलांना करोनाचा धोका जास्त; डॉक्टरांनी दिला ‘हा’ सल्ला

0
18

 मुंबई (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन 

करोनाकाळात मुलांमध्ये वाढलेला लठ्ठपणा हा डोकेदुखीचा विषय ठरत आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना संसर्गाची अधिक शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुलांची काळजी घेताना त्यांचे वजन प्रमाणाबाहेर वाढू नये याकडेही लक्ष देण्याचा विशेष सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता लठ्ठ मुलांमध्ये अधिक असू शकते. त्यामुळे आशा सेविकांनी आपापल्या भागामध्ये अशा मुलांकडे विशेषत्वाने लक्ष द्यावे, मुलांमध्ये गंभीर स्वरूपाची काही लक्षणे आढळून आली तर त्याची माहिती तातडीने द्यावी, असेही वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

प्रत्येक आशा सेविकेकडे एक विशिष्ट प्रकारचा तक्ता दिला आहे. या तक्त्यामध्ये मुलांचे नाडीचे ठोके, श्वासाचा वेग, लघवीचे प्रमाण, शरीरातील ऑक्सिजनची पातळी, मुलाची शारीरिक व मानसिक स्थिती असे काही महत्त्वाचे निकष दिले आहेत. हा तक्ता भरून डॉक्टरांना द्यावा. एखाद्या कुटुंबाला तो भरण्यामध्ये अडचणी येत असतील तर आशा कर्मचाऱ्यांनी मदत करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. करोनाव्यतिरिक्त गावामध्ये इतर कोणत्या प्रकारची साथ आली असेल वा आजाराच्या संदर्भात मुले तसेच प्रौढांमध्ये वेगळी लक्षणे दिसत असतील तर त्याचीही माहिती द्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.

ज्या मुलांमध्ये रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, प्रतिकारशक्तीचा आजार तसेच फुफ्फुसाचा आजार, किडनीचा त्रास, यकृतामध्ये बिघाड, लठ्ठपणा असेल, त्यांना करोनाची लागण झाल्यास अधिक गुंतागुंत होऊ शकते याकडे डॉ. विजय येवले यांनी लक्ष वेधले. ९० ते ९५ टक्के मुलांना सौम्य स्वरूपाचा संसर्ग होईल. या संसर्गावर घरीही वैद्यकीय उपचार देता येतील. त्यामुळे सौम्य स्वरूपाच्या आजारासाठी वैद्यकीय उपचार देताना या मुलांना १४ दिवस घरातून बाहेर पडण्याची संमती देऊ नये. वयस्कर व्यक्तींपासून त्यांना दूर ठेवावे, योग्य प्रकारच्या कापडी धुतलेल्या मास्कचा वापर करावा, मास्क तोंड व हनुवटी झाकेल अशा प्रकारे लावावा, तसेच मुलांना मास्कच्या बाहेरील बाजूस हात लावायला देऊ नये, असेही डॉक्टरांनी सांगितले. तान्ह्या बाळाचे स्तनपान बंद करू नये. पाच वर्षांवरील मुलांना कोमट पाण्याच्या गुळण्या करण्यास सांगावे, अशा सूचनाही डॉक्टरांनी केल्या आहेत.

Source link