‘भाजप हिंदू धर्माला बदनाम करण्याचं काम करतोय’

0
18

मुंबई: (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन 

पंढरपूरच्या आषाढी वारीच्या मुद्द्यावरून सध्या भारतीय जनता पक्ष व सत्ताधारी महाविकास आघाडी आमनेसामने आली आहे. करोनाच्या संकटामुळे गर्दी टाळण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. त्यासाठी धार्मिक उत्सव व यात्रांवर घालण्यात आलेले निर्बंध तूर्त कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र, भाजपनं त्यास आक्षेप घेतला आहे. आषाढी वारी पायी होऊ देण्याचा आग्रह भाजपनं धरला आहे. त्यावरून जोरदार शाब्दिक चकमकी सुरू आहेत.

आषाढी वारी यंदा पायी होऊ द्यावी, असा आग्रह भाजपच्या अध्यात्मिक आघाडीनं धरला आहे. ‘राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुघलांचे सरकार आहे. अनलॉकमध्ये सर्व गोष्टींना परवानगी दिली असताना फक्त मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. शिवाय, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाही. अनलॉकमध्ये मंदिरांचा समावेश करावा. यंदा पायी वारी झालीच पाहिजे, आम्ही तडजोड स्वीकारणार नाही,’ असा इशारा भाजपचे तुषार भोसले यांनी दिला आहे. त्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर तोफ डागली आहे.

‘भाजपचा हिंदू धर्मातील तत्त्वांशी संबंध नाही तर भाजप अध्यात्मिक आघाडीचा अध्यात्माशी संबंध नाही. तसेच यांचा वारकरी संप्रदायाशी संबंध नाही. हे सर्व असत्याचे पुजारी आहेत. पायी वारीबद्दल होत असलेल्या मागणीमागे राजकारण आहे. हे लोक वारकऱ्यांचे प्रतिनिधी नाहीत तसेच त्यांना वारकऱ्यांच्या आरोग्याशी काहीही देणेघेणे नाही. पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी दरवर्षी लाखो वारकरी पायी चालत वारी करतात, परंतु मागील वर्षापासून करोनाचा धोका आणि लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याचा विचार करून महाराष्ट्र सरकारनं त्यावर निर्बंध घातले आहेत. मागील वर्षी मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत वारी सोहळा साजरा करून परंपरा खंडित होऊ दिली नाही. वारीमध्ये केवळ वारकरी नव्हे तर भाविकही मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. त्यामुळं याही वर्षी राज्य सरकार वारकऱ्यांच्या हिताचा विचार करूनच निर्णय घेईल.
परंतु पायीच वारी करा असा आग्रह करून वारकऱ्यांचं तसंच, स्थानिक लोकांचं आरोग्य धोक्यात घालण्याचा या मंडळींचा उद्योग दिसत आहे,’ असा आरोप सावंत यांनी केला आहे.

‘राजकारण व अध्यात्म हे परस्परविरोधी मार्ग आहेत. भाजपच्या अधर्माचा अध्यात्माशी संबंध काय? भाजपची अध्यात्मिक आघाडी या थोतांडातून हिंदू धर्म बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. भोंगळवाद स्थापित करण्याचं काम भाजप करत आहे,’ असा आरोप सचिन सावंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. ‘योगी, साध्वी, बाबा व स्वामी इत्यादी विशेषणे ही हिंदू धर्मात अत्यंत आदरणीय आहेत. स्वतःला मायेपासून, काम, क्रोध, लोभ आणि द्वेषापासून मुक्त करून समाजाला अध्यात्माकडे घेऊन जाणारे हे लोक असतात. भाजप आणि संघाने अशी विशेषणे लावणाऱ्या बोगस लोकांना पदे देऊन हिंदू धर्माचा अवमान केला आहे. भाजप अध्यात्मिक आघाडीच्या नावानं भाजपनं हिंदू धर्माचे विकृतीकरण करण्याचे व सत्तेच्या राजकारणासाठी अध्यात्म या ईश्वर प्राप्तीच्या वैयक्तिक मार्गाला व पवित्र संकल्पनेला बदनाम करण्याचं पाप केलं आहे. अशा लोकांपासून जनतेनं सावध व्हावं आणि त्यांचा कुटील हेतू साध्य होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असं आवाहनही सावंत यांनी केलं आहे.
मागील वर्षीच्या लॉकडाऊन काळातही मंदिरं उघडण्यासाठी भाजप आक्रमक झाला होता. मात्र, करोनाच्या संकटामुळं राज्य सरकारनं सावध भूमिका घेतली होती. त्यावेळी भाजपनं राज्यभर घंटानाद आंदोलनही केलं होतं. आता पुन्हा वारी व मंदिरांच्या मुद्द्यावरून भाजपनं सरकारला घेरलं आहे.

Source link