निलेश ज्ञानेश्वर घुले असं हल्ला झालेल्या 30 वर्षीय तरुणाचं नाव आहे. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास तो आपल्या घराच्या पाठीमागील शेतात गेला होता. दरम्यान बिबट्यानं अचानक त्याच्यावर हल्ला केला. बिबट्यानं हल्ला केल्यानंतर निलेश घाबरून गेला. पण त्यानं धाडसीपणानं प्रतिहल्ला करत बिबट्याशी लढा दिला आहे. तसेच आरडाओरडा करत बिबट्याला पळवून लावलं आहे. या हल्ल्यातून निलेश बचावला असला तरी त्याच्या अंगावर अनेक ठिकाणी बिबट्यानं चावा घेतला आहे.
निलेश याच्या अंगावर बिबट्यानं तब्बल 30 वेळा चावा घेऊनही निलेश सुखरूप बचावला आहे. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. शिवाय हल्ला परतवून लावल्यानंतरही वस्तीच्या आसपास कोणी नसल्यानं त्याला तात्काळ मदत मिळू शकली नाही. यानंतर जुन्नर येथील पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्वरित घटनास्थळी येऊन निलेशला रुग्णालयात दाखल केलं. ओतूरच्या प्राथमिक केंद्रात उपचार केल्यानंतर, निलेशला बिबट्या दंशाची लस देण्यासाठी ससूनला हलवण्यात आलं आहे.