पुणे, 11 जून: आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री (Deputy CM)अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते पुण्यातील पोलीस मैदानावर (Pune Police Headquarters) पोलिसांतील कोविड फायटर्सचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुण्यातील पोलीस मुख्यालयाची नुतनीकरणाची पाहणी अजित पवार यांनी केली. या बांधकामाचा आढावा घेताना कामाच्या दर्जावरुन अजित पवार चांगलेच संतापले. अजित दादांनी अधिकारी आणि कंत्राटदारालाही धारेवर धरलं.
अजित पवार सकाळीच पुणे पोलीस मुख्यालयात दाखल झाले होते. अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील पोलीस मैदानावर पोलिसांतील कोविड फायटर्सचा सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सत्कार समारंभानंतर अजित पवारांनी पोलीस मुख्यालयातील ब्रिटिशकालीन वास्तूचं नुतनीकरणाची पाहणी केली. या वास्तूमध्ये आता विविध विभागाची कार्यालये सुरू केली जाणारेत.
नुतनीकरणाच्या पाहणीसोबत अजित पवार यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबतही चर्चा केली. यावेळी व्यवस्थित काम करण्यात आलं नसल्याचं अजित पवारांच्या निदर्शनास आलं. लगेचच अजित दादांनी संबंधित ठेकेदाराला बोलवलं आणि कामावरुन त्याची कानउघाडणी केली.
गुप्ता मला अशा कामाच्या पाहणीला बोलावलं तर मी लई बारीक बघतो. माझ्या भाषेत बोलायचं तर हे ‘छा-छू’ काम आहे. या ठेकेदाराने पोलिसांचच काम अस केलंय तर बाकीच्यांचे काय?” असा प्रश्न विचार अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनाही सुनावलं. चांगलं काम बघण्यासाठी मला बोलवा, असं म्हणत कामाच्या दर्जावर अजित पवार संतापले.
या भाषेत अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तांना सुनावलं तसंच झाडाझडती घेतली.