कोरोना विषाणूच्या (Corona virus) वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्यात संचारबंदी (Curfew in Pune) लागू करण्यात आली आहे. असं असताना पुण्यात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या एका हॉटेलवर भारती विद्यापीठ पोलिसांनी धाड (Police raid on hotel) टाकली आहे. यावेळी पोलिसांनी हॉटेल मालकासह एकूण 41 जणांना ताब्यात (41 people arrested) घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय पोलिसांनी हॉटेलसमोर उभ्या असलेल्या 25 दुचाक्या, एक रिक्षा, एक चारचाकी असा एकूण सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भारती विद्यापीठ पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार विजय दुधाळे आणि शिंदे कात्रज परिसरात गस्त घालत होते. यावेळी मांगडेवाडी फाटा येथील साई गार्डन या हॉटेल समोरील पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी पार्क केल्या असल्याचं त्यांना दिसलं. यामुळे दुधाळे आणि शिंदे यांनी हॉटेलात प्रवेश केला. यावेळी हॉटेलमध्ये बरीच लोकं दारू पित असल्याचं त्यांना दिसलं. यानंतर पोलीस अंमलदार दुधाळे यांनी या घटनेची माहिती तात्काळ वरिष्ठ पोलिसांना दिली.
वरिष्ठ पोलिसांनी ताबडतोब पोलीस पथक पाठवून संबंधित हॉटेलवर छापा टाकला. याठिकाणी संचारबंदीचे नियम डावलून एकूण 39 जण एकत्र येऊन दारु पित बसले होते. संचारबंदीचे नियम मोडणे, एकत्र जमा होणे, अवैधरित्या दारु पिणे अशा विविध गुन्हांतर्गत भारती विद्यापीठ पोलिसांनी हॉटेल मालकासह एकूण 41 जणांना अटक केली आहे.
[ad_2]