खेड, 13 जून: खेड तालुक्यातील वाडा येथील 22 वर्षीय तरुण कुणाल पावडे याचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयाने उपचाराच्या बिलासाठी कुणालचा मृतदेह तब्बल 18 तास अडवून धरला होता. जोपर्यंत उपचाराचं बील भरली जात नाहीत, तोपर्यंत मृतदेह घेऊन जाता येणार नाही, असा पवित्रा रुग्णालयाने घेतला होता. अनेक विनवण्या करूनही रुग्णालयाने आपली भूमिका बदलली नाही. त्यामुळे हवालदिल झालेल्या कुटुंबीयांनी अजित पवारांकडे मदतीची याचना केली. यानंतर पवारांनी एक फोन करेपर्यंत रुग्णालयाने कुणालचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.
22 वर्षीय कुणालला काही दिवसांपूर्वी काविळची बाधा झाली होती. त्यामुळे त्याला रॉबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याठिकाणी त्याचा आजार वाढत गेल्याने यकृत प्रत्यारोपण करावं लागेल, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. यकृत प्रत्यारोपणासाठी रुबी हॉलने 10 लाख रुपये ऑपरेशनचे आणि 2 लाख रुपये औषधोपचाराचे होतील, असं कुटुंबीयांना सांगितलं.
रुग्णालयाने सांगितल्याप्रमाणे कुटुंबीयांनी 12 लाख रुपये रुग्णालयात जमा केले. कुणालची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. त्यामुळे ही रक्कम भरण्यासाठी समाजातून काही निधी गोळा करण्यात आला होता. तर काही मदत एनजीओ संस्थेकडून करण्यात आली होती. बहिणीने यकृत दान केल्यानंतर कुणालवर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. पण सहा दिवसांतच प्रकृती खालावल्याने कुणालचा मृत्यू झाला.