[ad_1]
मंचर, 07 जून: (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन
मागील काही दिवसांपासून जगभर कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. भारतासाठी कोरोना विषाणूची दुसरी लाट अत्यंत घातक ठरली आहे. दरम्यानच्या काळात देशात अनेकांनी आपल्या जीवाभावाच्या लोकांना गमावलं आहे. त्यामुळे देशातील असंख्य कुटुंबं पोरकी झाली आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना आंबेगाव तालुक्यातील चोंडोली बुद्रुक याठिकाणी घडली आहे. अवघ्या काही तासांच्या अंतराने या पिता पुत्राचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. घरातील कर्ती लोकं कोरोनानं हिरावल्यानं कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नारायण गंगाराम थोरात (वय-65) आणि रवींद्र नारायण थोरात (वय-38) असं कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बापलेकाचं नाव आहेत. मुलगा रवींद्र थोरात यांना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना भोसरीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान याठिकाणी उपचार सुरू असतानाचं मृत रवींद्र थोरात यांच्या वडिलांना देखील कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांनाही पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल केलं.
दोघांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान 4 जून रोजी अचानक मुलगा रवींद्र यांची ऑक्सिजन पातळी अचानक खालावली. त्यामुळे काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. रवींद्र यांच्या मृत्यूची बातमी कळताचं कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मुलाच्या मृत्यूचा शोकही संपला नव्हता. तोपर्यंत कोरोना विषाणूनं थोरात कुटुंबीयांवर दुसरा घात केला. मुलाच्या मृत्यूनंतर काही तासातच वडील नारायण थोरात यांचाही मृत्यू झाला. कोरोनानं अचानक घरातील दोन्ही कर्त्या पुरुषांचा घास घेतल्यानं थोरात कुटुंबीय पोरके झालं आहे.
[ad_2]