पुणे, 12 जून: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) हे शहरातील निसर्गरम्य ठिकाण आहे. याठिकाणी शहारातील अनेक विद्यार्थी आणि नागरिक सकाळी आणि सायंकाळी फिरण्यासाठी आणि व्यायामासाठी येतात. गेल्या अनेक वर्षांपासून अनेकांचा असाच दिनक्रम आहे. पण विद्यापीठ परिसरात व्यायाम अथवा फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडून प्रत्येकी 1 हजार रुपये आकरले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. या निर्णयाला अनेक विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी विरोध दर्शवला आहे, त्यामुळे पुणे विद्यापीठाने या निर्णयाला स्थिगिती दिली आहे.
‘SPPU OXY PARK’ असं या योजनेचं नाव होतं. या योजनेंतर्गत विद्यापीठात व्यायामाला आणि विहाराला येणाऱ्या नागरिकांना सभासद नोंदणी करून त्यांच्याकडून एक हजार रुपये घेतले जाणार होते. ही योजना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्त्यावर लागू केली जाणार होती. पण नागरिकांकडून पैसे उकळवण्याचा हा नवा फंडा असल्याची टीका अनेकांकडून करण्यात आली.
विद्यापीठ हे शासकीय ठिकाण असताना विद्यापीठ रजिष्टार आणि कुलगुरू यांनी संगनमताने सामान्य नागरिकांना लुटण्याचा हा नवीन उद्योग सुरू केल्याची टीका पुणेकरांकडून करण्यात आली होती. पुणेकरांकडून होणारी वाढती टीका लक्षा घेता महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ प्रशासनाशी संवाद साधला आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘एसपीपीयू ऑक्सी पार्क’या योजनेंतर्गत विद्यापीठात सकाळ व संध्याकाळी फिरणाऱ्या सामान्य नागरिकांनाही शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय स्थगित करून योजनेची पुनर्रचना करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या असून लवकरचं स्थगितीचे परिपत्रक निघेल.
— Uday Samant (@samant_uday) June 12, 2021
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘SPPU OXY PARK’ या योजनेंतर्गत विद्यापीठात सकाळ आणि सायंकाळी फिरायला येणाऱ्या सामान्य नागरिकांनाकडून शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय स्थगित करून योजनेची पुनर्रचना करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. याबाबत स्थगितीचं परिपत्रक लवकरचं विद्यापीठ प्रशासनाकडून जारी केलं जाईल, अशी माहिती सामंत यांनी दिली आहे.