
पुणे, 12 जून : देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या (Coronavirus second wave) दुसऱ्या लाटेनं कहर केला. आता ही लाट काहीशी ओसरताना दिसत आहे. परंतु, या लाटेचा दणका सर्वसामान्यांना अधिक प्रमाणात बसला. अनेक रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडस, औषधांच्या तुटवड्याचा सामना देखील करावा लागला. कोरोनाच्या या लाटेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या मोठी आहे. एकाच घरातील अनेक व्यक्ती कोरोनामुळे मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे बऱ्याच मुलांनी त्यांचे पालक गमावले त्याच प्रमाणे अनेक पाळीव प्राण्यांनी (Pets) त्यांचे मालक गमावले. या पार्श्वभूमीवर त्या घरातील पाळीव प्राण्यांचे काय असा प्रश्न साहजिकच निर्माण होताना दिसत आहे. परंतु, या समस्येवरही उत्तर शोधण्याचा प्रयत्न पुण्यातील काही तरुणांनी केला आहे.
स्टार्टअपच्या माध्यमातून शोधले समस्येवर उत्तर
टाईम्स नाऊ डॉट कॉमच्या वृत्तानुसार, पुण्यात कोरोना विषाणूमुळे मालक गमवलेल्या पाळीव प्राण्यांची काळजी घेण्यासाठी स्टार्टअपच्या (Start-up) माध्यमातून डॉग-बोर्डींग सेवा (Dog Boarding Service) सुरु करण्यात आली आहे. Wiggles.in या स्टार्टअपने पुणे परिसरातील निवासी भागातील पाळीव प्राण्यांसाठी आपले दरवाजे खुले केले आहेत. पेट्स व्हिला या सुविधेचा विस्तार पुण्यातील सूस-नांदे रोडवरील 22,000 चौरस फुटांवर विस्तारला आहे. कुत्र्यांची गरज आणि काळजी घेण्यासाठी पेटसव्हिलाकडे 60 तज्ज्ञांची टिम आहे. या टिम मध्ये पशुवैद्यक, ट्रेनर, ग्रुमर, पॅरा-व्हेटस, कॅनाईन, बिहेव्हिअररिस्ट, हॅंडलर आदीं समावेश असून, पाळीव प्राण्यांची काळजी घेण्यासाठी ऑर्गनायझेशनचे कर्मचारी देखील उपलब्ध आहेत.
असे दाखल केले जाते सुविधा केंद्रात
संबंधित मालकाच्या घरातून पाळीव प्राण्यास उचलल्यानंतर आमची टिम प्रथम त्या प्राण्याला अंघोळ घालते. त्यानंतर त्यास या सुविधा केंद्रावर आणले जाते आणि पशुवैद्यकांमार्फत ( veterinary ) त्या प्राण्याची आरोग्य तपासणी केली जाते. त्यानंतर पाळीव प्राण्याच्या आरोग्य आणि आहाराची योग्य ती काळजी घेतली जाते, असे विगलेस डॉट इनचे पशुवैद्यकीय सेवा संचालक डॉ. दिलीप सोनुने यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले.
असा दिला जातो आधार
पाळीव प्राणी त्यातही विशेषतः कुत्री ही अंर्तज्ञानी आणि त्यांच्या मालकांशी समरस झालेली असतात. अनेक पाळीव प्राण्यांना त्यांचे मालक आता हयात नाही हे संवेदनेव्दारे कळते आणि ते असहाय्य होऊन आसपास मालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात, असे डॉ. देशपांडे यांनी सांगितले. डॉक्टरांनी पुढे स्पष्ट केले की कुत्र्यांना भावनिक आधार देणे आणि त्यांची काळजी घेणे तसेच मालक गमवल्याच्या दुःखातून त्यांना बाहेर काढण्यासाठी विविध अॅक्टिव्हिटीजमध्ये गुंतवणे यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे.
अशी दिली जाते सुविधा
या स्टार्टअपने पाळीव प्राण्यांसाठी सुंदर अशी सुविधा निर्माण केली आहे. सॅनिटाईज्ड वाहने, पीपीई किट परिधान केलेले कर्मचारी आदींच्या मदतीने आणि सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करीत संबंधित घरातून पाळीव प्राण्यांना नेण्याची प्रक्रिया अत्यंत हळूवारपणे आणि सुरक्षितपणे संस्थेकडून राबवण्यात येते.