पिंपरी, 27 जून: वारंवार प्रपोज करूनही नकार दिल्यानं संतापलेल्या तरुणानं एका तरुणीच्या कानशिलात (Young man slapped young woman) लगावल्याची घटना समोर आली आहे. आरोपी तरुण मागील दीड वर्षांपासून पीडितेचा सतत पाठलाग करत होता. दरम्यानच्या काळात त्यानं अनेकदा पीडितेला प्रपोज केला आहे. पण पीडितेनं आरोपीला प्रत्येक वेळी नकार दर्शवला आहे. वारंवार नकार दिल्यानं संतापलेल्या तरुणानं पीडित तरुणीला कानशिलात लगावली आहे. याप्रकरणी पीडितेनं पिंपरी पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरुद्ध मारहाण (Beating) आणि विनयभंगाचा (molestation) गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून या घटनेचा तपास सुरू आहे.
नितीन बाबुराव थेटे असं अटक केलेल्या 28 वर्षीय आरोपीचं नाव असून तो शिरुर तालुक्यातील केंदूर येथील रहिवासी आहे. आरोपी नितीन मागील दीड वर्षापासून पीडित तरुणीचा पाठलाग करत होता. ‘तू मला खूप आवडतेस, तू माझ्यासोबत बोलत जा, मी तुझ्यासाठी झुरत आहे.’ असं म्हणतं आरोपी वारंवार पीडितेला त्रास देत होता. अनेकदा ताकीद देऊनही आरोपी तरुण ऐकायला तयार नव्हता. तो नेहमी फिर्यादीच्या मागावर असायचा.
शुक्रवारी दुपारी फिर्यादी पिंपरीतील एका रुग्णालयात कामानिमित्त गेली असता, आरोपीही त्याठिकाणी पोहोचला. याठिकाणी त्यानं पुन्हा प्रपोज केला. यावेळीही तरुणीनं त्याला नकार दर्शवला. माझ्या मनात तुझ्याबद्दल असं काहीही नाही, असं स्पष्टपणे फिर्यादीनं आरोपीला सांगितलं. यामुळे संतापलेल्या आरोपी तरुणानं रागाच्या भरात फिर्यादीच्या कानशिलात लगावली. या घटनेनंतर पीडितेन तातडीनं पिंपरी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात, मारहाण, विनयभंग, पाठलाग करणे अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास केला जात आहे.