
पुणे महापालिकेमध्ये 2017 साली 34 गाव समाविष्ट करण्याचा (Pune) निर्णय राज्य सरकारने घेतला होता. पण त्यातील अनेक गावांना कोणत्याही पायाभूत सुविधा दिल्या जात नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त असून उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गाव वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
त्या निर्णयायाचे शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतरे यांनी स्वागत केले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तर त्याच दरम्यान पुरंदर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे पक्षाचे आमदार संजय जगताप यांनी राजकीय स्वार्थापोटी निर्णय घेतला असल्याचा आरोप शिंदे, फडणवीस सरकार आणि विजय शिवतरे यांच्यावर केला आहे. संजय जगताप यांच्या टीकेला विजय शिवतरे यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत विजय शिवतरे म्हणाले की, संजय जगताप हा माठ असून निवडणुकीच्या वेळी संजय जगताप नागरिकांना म्हणाले की, पुणे महापालिकेमध्ये माझा भाऊ (राजेंद्र जगताप) अतिरिक्त आयुक्त आहे. टॅक्स कमी करण्याच्या संदर्भातील निर्णय घेतला जाईल असे आश्वासन देण्यात आले.
पण, लोकांचा काही प्रश्न त्यांनी काही सोडविला नसून काही हजारांमध्ये येणारा टॅक्स आता लाखांमध्ये येत आहे. एवढा टॅक्स देऊन देखील नागरिकांना कोणत्याही प्रकाराच्या सुविधा दिल्या गेल्या नाही. या गावांमधील नागरिकांकडे तत्कालीन राज्य सरकार मधील पालकमंत्री (अजित पवार) आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी कधीच लक्ष दिले नाही.
त्या पार्श्वभूमीवर उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांची टॅक्स,पाणी यासह सर्व (Pune) समस्येतून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे पाठपुरावा केला. त्यानंतर आता दोन्ही गावांची नगरपालिका होणार आहे. त्यामुळे निश्चित ग्रामस्थांच्या सर्व समस्या सुटणार असून राज्य सरकार लवकरच निधी देखील उपलब्ध करेल. पण, महापालिका निवडणुकीसोबतच नगरपालिका निवडणूक घेतली जावी, अशी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.