
पुणे : उन्हाळी हंगामात लागवड झालेल्या टोमॅटोच्या पिकावर पाच प्रकारच्या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रयोगशाळेने टोमॅटोच्या पिकांची तपासणी केल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे.
जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांत यंदा तीन हजार एकरवर टोमॅटोची लागवड झाली आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये अनेक शेतकऱ्यांकडून विषाणूजन्य रोगांबद्दल तक्रारी येत आहेत. कृषी जिल्हा अधिकारी आणि कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ यांनी जुन्नर तालुक्यातील येडगाव, नारायणगाव, रोहोकडी, हिवरे तर्फे नारायणगाव तसेच आंबेगाव तालुक्यातील अवसरी, गावडेवाडी येथील टोमॅटो पीकांची पाहणी केली. फळे प्रयोगशाळेत तपासली.
त्यात प्रामुख्याने टोमॅटोवर येणारे ‘कुकंबर मोझक’, ‘ग्राऊंडनट बड नेक्रॉसीस’, ‘कॅप्सिकम क्लोरासीस’, ‘पॉटी व्हायरस’, ‘पोटॅटो व्हायरस एक्स’ या प्रकारच्या रोगांचे विषाणू सापडले आहेत, अशी माहिती नारायणगाव कृषी केंद्राचे प्रमुख प्रशांत शेटे यांनी दिली.
पिकांची फेरपालट करणे आवश्यक
पिकांवरील सर्व विषाणूंचा प्रसार प्रामुख्याने मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, रसशोषक किडींमुळे होतो. रसशोषक किडींचे नियंत्रण तसेच विषाणूंची साखळी तोडण्यासाठी पिकांची फेरपालट करणे गरजेचे आहे.