
या परीक्षेसाठी विविध अभ्यासक्रमांच्या एकूण 6 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
पुणे, 05 जुलै: कोरोनामुळे (Corona) लांबणीवर गेलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune University) शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या दुसऱ्या सत्रातील परीक्षांची (Second semester Exams) तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. येत्या 12 जुलैपासून ही परीक्षा घेण्यात येणार आहे. ऑनलाइन आणि प्रॉक्टर्ड (Proctor) पद्धतीनं ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी विविध अभ्यासक्रमांच्या एकूण 6 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून पदविका (Diploma), पदवी (Degree), पदव्युत्तर पदवी (Post Graduation), प्रमाणपत्र (Certifications) आणि इतर अशा एकूण 284 अभ्यासक्रमांसाठी 4 हजार 195 विषयांसाठी ही ऑनलाईन परीक्षा (Online Exam) घेतली जाणार आहे. मुख्य परिक्षेआधी याही सत्रात 8 ते 10 जुलैदरम्यान विद्यार्थ्यांची सराव परीक्षा (Mock test) घेण्यात येणार आहे. या सराव परीक्षेत विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.
अशा पद्धतीनं होणार परीक्षा
गैरवर्तन होऊ नये म्हणून करणार हा उपाय
ऑनलाईन परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन करू नये यासाठी या सत्र परीक्षेत प्रायोगिक तत्वावर काही विद्यार्थ्यांचा आवाज रेकॉर्ड (Voice Record) करण्यात येणार आहे. यामुळे परीक्षा अधिक पारदर्शक होण्यास मदत होईल असं परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितलं आहे.
विद्यार्थी यासाठी करू शकतात तक्रार
लॉग इन (Log in) न होणे, मधेच लॉग आउट होणे, इंग्रजी किंवा मराठी माध्यम प्रश्नपत्रिका उपलब्ध न होणे, आकृत्या न दिसणे, पेपर सबमिट न होणे, विद्यार्थ्यास परीक्षेच्या वेळी कोविड विषाणू बाधा झालेली असणे, विद्यापीठ आयोजित परीक्षा किंवा अन्य सीए, सीईटी किंवा इतर परीक्षा एकाच दिवशी येणे अशी कारणं असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडे तक्रार करता येणार आहे. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांना त्या परीक्षेचं हॉल तिकीट दाखवावं लागणार आहे.
या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र परीक्षा
कोरोनामुळे जे विद्यार्थी अजूनही परीक्षेसाठी अर्ज करूशकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. अशा विद्यार्थ्यांनी 12, 13 आणि 14 जुलैदरम्यान अर्ज करायचे आहेत. अशा विद्यार्थ्यांची परीक्षा स्वतंत्ररित्या घेण्यात येणार आहे.