पुणे, 11 जुलै: महाविकास आघाडी सरकारचे (MVA government) मंत्री आणि आमदारांच्या विरोधात ईडीचा ससेमिरा लागला आहे. भाजप सोडून राष्ट्रवादीत दाखल झालेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना ईडीने (ED) समन्स बजावला आहे. पण, मी खडसेंच्या सीडीची वाट पाहतोय, एखाद्या माणसाला संपवण्यासाठी ईडीचा वापर हा चुकीचा आहे, असं मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांनी व्यक्त केलं.
पुण्यात राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना राज ठाकरेंनी राजकीय घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट केली.
‘मी एकनाथ खडसे यांच्या सीडीची वाट पाहत आहे. खडसे म्हणाले होते कि, माझ्यामागे ईडी लावली तर सीडी लावीन, त्यामुळे ते सीडी कधी लावणार याची वाट पाहतो. याच्याआधी सुद्धा तपास यंत्रणाचा चुकीच्या पद्धतीने वापर झालाय. काँग्रेसच्या काळात सुद्धा याचा वापर झाला आहे. आता भाजपच्या काळात सुद्धा ईडीचा वापर होत आहे, मुळात एखाद्या माणूस आपल्याविरोधात गेला म्हणून त्याला संपवण्यासाठी यंत्रणेचा वापर चुकीचा आहे’, असं राज ठाकरे म्हणाले.