पुणे, 14 जून: मराठा आरक्षणाच्या (maratha reservation) मुद्यावर खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) आणि उदयनराजे भोसले यांची भेट झाली. या भेटीनंतर उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांनी 16 तारखेला कोल्हापूरमधील आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तसंच, मराठा आरक्षण देणे ही ठाकरे सरकारची जबाबदारी आहे, जर त्यांनी निर्णय घेतला नाहीतर उद्रेक होईल, असा इशाराही उदयनराजेंनी दिला.
‘आम्ही दोघे एकाच घराण्यातले आहोत. त्यामुळे इथं दोन घराण्याचा संबंध येत नाही. संभाजीराजे यांनी जे विचार मांडले त्याचाशी मी सहमत आहे’ असं उदयनराजे यांनी स्पष्ट केलं.
‘संभाजीराजे यांच्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा विषय आहे. पण आमचा मार्ग हा एकच आहे’ असंही उदयनराजेंनी ठणकावून सांगितलं.