पुणे, 19 जून : पुण्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ दांडेकर पुलावरील असल्याचं सांगितलं जात आहे. दांडेकर पुलावर कोरोना नियमाच्या बंदोबस्तासाठी असलेल्या होमगार्डसोबत अत्यंत अर्वाच्च भाषेत संभाषण केल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. याआधीदेखील देशातील विविध भागांमधून नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्यास सांगितल्यानंतर त्यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया पाहायला मिळाली आहे. अनेकांनी तर रस्त्यावरच पोलिसांशी वाद घातला आहे आणि त्यांना शिवीगाळही केली आहे. पुण्यातील या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे होमगार्डला बोलणारी ही महिला पोलीस असल्याचं सांगितलं जात आहे. (Pune Viral Video)
दांडेकर पूल परिसरात बंदोबस्तावर असलेल्या होमगार्ड जवानाशी आलिशान कारमधून चाललेल्या महिला पोलिसाचा कमालीच्या उर्मट भाषेतला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कोरोना नियमांनुसार एका गाडीतून चार जणांना प्रवास करण्यास परवानगी नसताना ही महिला चार जणांना गाडीतून प्रवास करीत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यावरुन होमगार्डने दांडेकर पुलावर या महिलेची गाडी थांबवली. मात्र यानंतर महिला होमगार्डसोबत अतिशय वाईट शब्दात बोलू लागली. होमगार्ड आहेस तर होमगार्डसारखं राहा..असं म्हणत तिने त्याचा अपमानही केला. मिळालेल्या माहितीनुसार माफी मागून हा प्रश्न तात्पुरता सोडविण्यात आला. मात्र महिलेने ज्या पद्धतीने होमगार्डशी संवाद साधला ते अत्यंत धक्कादायक आहे. या प्रकरणात कडक कारवाई केली जावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
हा व्हिडीओ जुना असल्याचंही काही जणांचं म्हणणं आहे. अद्याप या महिला पोलिसाचे नाव समोर आलेले नाही. तरी या प्रकरणात तपास सुरू आहे.