
मुंबई, 27 जून: सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात नैऋत्य मोसमी वाऱ्याचं (Monsoon) आगमन झालं आहे. पण अनेक ठिकाणी पावसानं दडी मारली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातही मान्सूननं विश्रांती घेतली आहे. पुढील आणखी एक आठवडा राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पण राज्यात मान्सून वापसी व्हायला आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल. राज्यात मान्सूननं ब्रेक घेतल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट घोंघावत आहे. आणखी काही दिवस राज्यात मान्सूननं उघडीप घेतली तर शेतकऱ्यांची भीती वास्तवात उतरू शकते. कालपासून राज्यात मान्सून पूर्वपदावर येण्याचे संकेत देत आहे.
काल आणि आज राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद झाली आहे. आज सकाळपासूनच राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या आहे. पण पुढील तीन तासांत मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील तीन तासांत दमन, पालघर, डहाणू, मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
त्याचबरोबर रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यासह घाट परिसरातील अनेक शहरात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. याबाबतची माहिती भारतीय हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी आपल्या अधिकृत ट्वीटद्वारे दिली आहे.
Possibilities of some intense spells of rains over parts of Daman Palghar Dahanu Mumbai Thane and Raigad districts during this 2,3 hrs as seen from latest satellite image at 13.45 hrs.
N Ratnagiri too,
Pune Satara including Ghat
areas too
Watch for IMD updates. pic.twitter.com/40lebmkE6j
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 27, 2021
याशिवाय आज विदर्भातही बहुतांशी ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. नागपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्याच्या साथीनं मेघ बरसणार आहेत. दरम्यान याठिकाणी 30 ते 40 किमी प्रतितास वेगानं वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाच्या वातावरणात घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांकडून देण्यात आला आहे.