बारामती (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना मध्यरात्री महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस देत बारामती ॲग्रोचे (Baramati Agro) दोन प्लांट बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत. सूडबुद्धीने कारवाई झाल्याचा आरोप रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. मात्र यावर सविस्तर बोलण्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नकार दिला आहे. “मी कारवाईबाबत बोलणार नाही,” असं शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आमदार रोहित पवार यांना मध्यरात्री नोटीस देत बारामती ॲग्रोचे दोन प्लांट बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत. यासाठी रोहित पवार यांना मंडळाकडून 72 तासांची मुदत देखील देण्यात आली आहे. नोटिसीमध्ये संबंधित प्रकल्प बंद करावेत अशा सूचना नमूद करण्यात आले आहेत.
स्वत: रोहित पवार यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली. तसंच आपल्यावरील कारवाई सूडबुद्धीने केल्याचं म्हटलं. राज्यातील 2 ज्येष्ठ नेत्यांनी माझ्या वाढदिवसा दिवशी मला जरी गिफ्ट दिल असलं तरी आगामी निवडणुकांच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेच्या माध्यमातून त्यांना रिटर्न गिफ्ट मिळेल, असं त्यांनी म्हटलं.
शरद पवार यांनी बारामती अॅग्रो प्लांटवरील कारवाईवर अधिक भाष्य करणं टाळलं.